नितेशला जामीन मिळताच नारायण राणे अ‍ॅक्टिव्ह; संजय राऊतांना म्हणाले तुमचे दिवस संपले!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० फेब्रुवारी २०२१ । मुंबई । ‘ईडी’च्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर आगपाखड करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे  रिंगणात उतरले आहेत. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंबीयांपैकी कोणीही फारसे बोलताना दिसत नव्हते. राणे कुटुंबीय नितेश यांना जामीन कधी मंजूर होतो, या प्रतीक्षेत होते. अखेर बुधवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर काही तासांमध्ये नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पहिला वार केला. नारायण राणे यांनी ट्विट करुन म्हटले की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत”. तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत, तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही. संजय राऊत शिवसेना मुंबईचा दादा असल्याचे म्हणतात. पण ते फक्त ‘मातोश्री’पुरतेच दादा आहेत. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे, ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. संजय राऊत यांचे धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत, असे नारायण राणे यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना याला काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ईडीकडून संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या ‘ईडी’च्या ताब्यात असलेले प्रवीण राऊत यांची कसून चौकशी सुरु आहे. प्रवीण राऊत यांच्या आर्थिक व्यवहारांशी एका बड्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याची चर्चा आहे. ही व्यक्ती म्हणजे संजय राऊत असल्याचेच काहीजणांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत ईडीच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली होती. महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्यमातून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र, मी या दबावापुढे झुकणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकारपरिषद घेऊन अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
संतोष परब हल्लाप्रकरणात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे चांगल्या ह्रदयरोग तज्ज्ञांकडून उपचार करवून घेण्यासाठी नितेश राणे (Nitesh Rane) यांना ओरोस जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. कालपर्यंत नितेश राणे यांना छातीच्या दुखण्यासोबत उलट्यांचा आणि स्पॉन्डिलाइटिसचा प्रचंड त्रास जाणवत होता. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना आज लगेचच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. थोड्याचवेळात नितेश राणे सीपीआर रुग्णालयातून सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होतील. सिंधुदुर्गात आल्यानंतर नितेश राणे यांची ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर नितेश राणे जामिनाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात जातील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे यांची जामिनावर सुटका होईल. त्यामुळे नितेश राणे आजच आपल्या घरी परतण्याची शक्यता आहे.


Back to top button
Don`t copy text!