दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषद हद्दीतील पाचबत्ती चौकातील परिसरात शाळेचे बांधकाम पुन्हा सुरू आहे. मात्र, शाळेच्या क्रीडांगणावर शॉपिंग सेंटर निर्माण करून शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे हे काम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी म्हटले आहे. हे बांधकाम करणार्यांची चौकशी करून या बांधकामावर निर्बंध आणावेत. दहा दिवसात जर यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांना आज सादर केले आहे.
निवेदनात मोरे यांनी म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेचा सध्या गलथान कारभार सुरू आहे. शाळा तेथे क्रीडांगण, असे शासनाचे धोरण असताना फलटण नगर परिषद क्रीडांगणावर शॉपिंग सेंटर बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. या बांधकामासाठी २ कोटी २५ लाख रुपये खर्च करून प्रशासन काय साध्य करणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शासनाच्या धोरणानुसार मैदान नसल्यास शाळेला मान्यता देता येत नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळेला कुंपण या सर्व गोष्टींना नगरपालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे.