स्थैर्य,मुंबई, दि. ४: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज विधिमंडळ कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्त केला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांनी हा राजीनामा दिला. नाना पटोले यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आज रात्रीच जाहीर केले जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा देण्यापूर्वी सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांकडे आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार आहे. येत्या काळात सुद्धा हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढणार आहेत. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्याच तोडीचा नेता काँग्रेसला हवा. यासाठी नाना पटोले यांच्यासह सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांचीही नावे समोर येत होती.
नुकतेच नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असेही समोर आले. शेवटी त्यांनी आज आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.