म्हसवड कोव्हीड रुग्णालय नावाला, उपचार मिळेना रुग्णाला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

म्हसवड शहरातील कोरोनाची भयानक वाटचाल

स्थैर्य, म्हसवड दि.३१ (महेश कांबळे) : म्हसवड सह परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय टळावी याकरीता शहरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल केलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी त्याठिकाणी कोणी डॉक्टरच उपलब्ध नाहीत डॉक्टर आले तर फिजीशिअन, टेक्निशिअन नाहीत कर्मचारी स्टाफ नाही अशी सर्व विचित्र व गोधळाची परिस्थिती आहे त्यामुळे याठिकाणी येणार्या रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण हे खुप वाढले असुन हे कोव्हीड सेंटर म्हणजे मृत्यु केंद्र बनल्याची भावना सर्वसामान्य जनतेची बनली आहे, त्यामुळेच सदरचे कोव्हीड सेंटर हे नावालाच उभारले असल्याची वस्तुस्थिती असुन याठिकाणी आलेल्या कोरोना रुग्णाला उपचार मिळत नसल्याचा आरोप म्हसवडकर जनतेतुन केला जात आहे.

म्हसवड शहरात कोरोनाचा विस्फोट झाल्यानेच या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १५० पार झाली असुन अद्यापही शहरात दररोज वाढणार्या कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच आहे, रोज वाढणार्या कोरोना रुग्णांमध्ये काही अस्वस्थ रुग्णांवर आय.सी.यु.मध्ये उपचार करण्याची गरज असते अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातच आता बेड शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती आहे प्रत्येक खाजगी तथा सरकारी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक ठिकाणी बेडसाठी वेटींग आहे. ही सर्व परिस्थिती पाहुन म्हसवडकर जनतेची सोय व्हावी म्हणुन शहरात कोव्हीड रुग्णालय सुरु करावे याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाच दिवसांपुर्वी आंदोलन करीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत जोवर शहरात कोव्हीडचे रुग्णालय सुरु होत नाही तोवर जागेवरुन न उठण्याचा निर्धार केल्याने प्रशासनाने अधिग्रहण केलेले एक रुग्णालय ताब्यात घेत त्याठिकाणी कोव्हीड रुग्णालय सुरु केले. मात्र सदरचे हे रुग्णालय म्हणजे असुन अडचण अन नसुन खोळंबा याप्रमाणेच असल्याचे चित्र आहे. मुळातच सदरचे ते खाजगी रुग्णालय कोव्हीड सेंटर साठी देण्यास संबधीत डॉक्टरांचा विरोध होता, यात काही राजकिय हितसंबध व नातेसंबधही जोपासण्याचा प्रयत्न होता मात्र प्रशासनावर जनतेचा खुपच रेटा सुरु असल्याने प्रशासनानेही मग सदरचे ते रुग्णालय ताब्यात घेत त्याठिकाणी कोव्हीड सेंटर सुरु केले. शहरात आता कोव्हीडचे रुग्णालय सुरु झाल्याने आता म्हसवडसह परिसरातील कोरोना बाधितांना बाहेर कोठे बेड शोधावे लागणार नाहीत अशी भावना म्हसवडकर जनतेत निर्माण झाली असतानाच जनतेच्या या भावनांचा भ्रमनिरास लगेचच झाला. सदरचे कोव्हीड रुग्णालय हे नावालाच असल्याचा प्रत्यय आता प्रत्येक म्हसवडकर जनतेला येवु लागला आहे. सदरच्या या रुग्णालयात कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचे याठिकाणी नियुक्ती केलेल्या डॉक्टरांचे म्हणणे असुन मी येथे येणार्या रुग्णांवर उपचार केले त्याची तपासणी केली तरी त्याला लागणारे औषधोपचार हा कोण करणार असा प्रश्न तेथील नियुक्त डॉक्टरांकडुन केला जात आहे. याठिकाणी कोणताही स्टाफ उपलब्ध नाही तर सदरच्या रुग्णालयात ऑक्सीजन ऑपरेटर नाही, नर्स नाही वा कोणी कर्मचारी नाहीत त्यामुळे सदर रुग्णालयाच्या केवळ चार भिंतीचेच प्रशासनाने अधिग्रहण केले आहे काय? असा प्रश्न सर्व म्हसवडकर जनतेला पडलेला आहे. ज्या दिवशी सदरचे रुग्णालय ताब्यात घेतले त्याच रात्री येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दोन्ही रुग्णांचा उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला तर दुसर्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा उपचार न मिळाल्याने २ रुग्ण दगावले त्यामुळे नागरीकांमध्ये खुपच घबराट निर्माण झाली असुन सदरचे रुग्णालय हे मृत्यु केंद्र आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वास्तवीक पाहता प्रशासनाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार शहरातील ३ ते ४ खाजगी रुग्णालयाची पाहणी करुन ती रुग्णालये अधिग्रहण करणार असल्याच्या सुचना संबधीत रुग्णालयातील प्रमुखांना दिल्या होत्या. मात्र आपले रुग्णालय प्रशासनाने कोव्हीडसाठी ताब्यात घेवु नये यासाठी सर्वांनीच लॉबींग सुरु करत कोव्हीडसाठी रुग्णालय देण्यास असहमती दर्शवत याला प्रखर विरोध ही केला मात्र म्हसवडकर जनतेच्या रेट्यापुढे प्रशासन ही ढिले पडले व त्यांनी अधिग्रहण केलेले एक रुग्णालय ताब्यात घेतले. सदरचे ताब्यात घेतलेले रुग्णालय हे कोव्हीडसाठी कसे चुकीचे ठिकाण आहे हे सांगण्यासाठी आरोग्य विभागाची एक टिमच शहरात याबाबत टिमकी वाजवत आहे. तर सदरचे रुग्णालय प्रशासनाने ज्यादिवशी ताब्यात घेतले त्या दिवसांपासुन तेथील डॉक्टर, कर्मचारी यांनी तेथे सेवा बजावण्यासाठी नकार घंटा वाजवली असल्याने तेथील सर्व यंत्रणाच ठप्प झाली आहे.

खरेतर शासनाच्या ज्या आरोग्यदायी योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी शहरातील अधिग्रहण केलेल्या रुग्णालयांनी शासनाकडे त्या योजना राबवण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचा करार केलेला आहे. सदरच्या शासकीय योजना राबवताना प्रत्येक रुग्णालयात या योजनेतील पात्र रुग्णांसाठी किमान ३५ बेड व १० आय.सी.यु.चे बेड असल्याचे दाखवावे लागते तेव्हाच या योजना राबवण्यासाठी शासकीय परवानगी मिळते. असे असताना शहरातील अधिग्रहण केलेली रुग्णालये आता शासनालाच देताना संबधीत रुग्णालयांच्या प्रमुखांकडुन नकार घंटा का वाजवण्यात येत आहे. वास्तवीक पाहता ज्या रुग्णालयात अशा प्रकारच्या शासकीय योजना चालतात त्या रुग्णालयांना शासनाकडुन आजवर लाखो रुपये देवु करण्यात आले आहेत असे असताना फक्त रुग्णालये योजना लाटण्यासाठीच आहेत का ? असा सवाल सर्वसामान्य नागरीकांच्या मनात निर्माण होत आहे. आज संपुर्ण म्हसवड शहर हे कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना स्थानिक डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांनी एक पाऊल आपल्या शहरासाठी पुढे येणे अपेक्षीत असताना हीच मंडळी एकमेकांच्या रुग्णालयांकडे बोट करीत असल्याने कोरोना बाधितांना एकप्रकारे वार्यावर सोडत आहेत. 

 

स्थानिक खाजगी दवाखान्याकडुन होत आहे टाळाटाळ 

शहरात सध्या कोरोना बरोबर अनेक व्याधींनी ग्रासलेले रुग्ण आहेत अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी दवाखान्यातुनही नकार दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. कोरोना रुग्णांची हेळसांड तर होतच आहे मात्र या कोरोनाच्या संसर्गामुळे इतर आजाराचे सामान्य रुग्णही तपासण्याकरीता दवाखान्यातुन निरुत्साह दिसुन येत आहे.

प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत 

सामान्य रुग्णांवर ज्या दवाखान्यात वा रुग्णालयात उपचार करण्यासाठी टाळटाळ केली जात आहे अशा दवाखान्यावर, रुग्णालयांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी तरच म्हसवडकर जनतेला उपचार मिळतील.

कोरोना योध्द्यांप्रमाणेच कोरोना प्रसारक ही कार्यरत

शहरात सध्या कोरोनाशी दोन हात करणारे अनेक योध्दे आहेत की जे स्वत: चा जिव धोक्यात घालुन काम करीत आहेत, या कोरोना योध्द्यांप्रमाणेच शहरात कोरोनाचे प्रसारकही कार्यरत असुन ते बाधितांच्या संपर्कात येवुनही कॉरंटाईन न राहता शहरात बिनदास्तपणे मोकाट फिरत आहेत त्यांच्याकडुनच कोरोनाचा प्रसार शहरात होत आहे.

आम्ही म्हसवडकर ग्रुपला पुन्हा एकदा आंदोलन करावे लागणार

शहरातील कोरोना बाधितांवर लवकरात लवकर उपचार व्हावेत याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या सदस्यांनी शहरात काही दिवसांपुर्वी आंदोलन केल्यानेच शहरात कोव्हीडचे रुग्णालय सुरु झाले आहे, मात्र या रुग्णालयात रुग्णांची फक्त हेळसांड होत असल्याने शहरातील रुग्णसेवा सुरळीत होवुन त्यांच्यावर सर्वोतोपरी तात्काळ ईलाज केला जावा याकरीता पुन्हा एकदा शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुपला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार असल्याचे जनतेतुन बोलले जात आहे.

म्हसवड जनतेचा अंत पाहु नये 

शहरात कोरोनामुळे मृत पावणार्यांची यादी दिवसेंदिवस वाढत असताना सर्व यंत्रणा चिडीचुप राहुन फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. म्हसवडकर जनता सोशीक नक्कीच आहे मात्र ती षंड कदापी नाही एकदा का या जनतेने ठरवले की मग मात्र सर्वच यंत्रणेची पळापळ झाल्याशीवाय राहणार नाही त्यामुळे म्हसवडकर आक्रमक व हिंसक होण्यापुर्वी येथील आरोग्य यंत्रणा सुरळीत लागावी यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे अपेक्षीत आहे.

पुढील ३ अठवडे महत्वाचे 

कोरोनाचा भर पुढील ३ अठवडे शहरात कायम राहणार असल्याने या काळात प्रत्येकाने काळजी घेवुन शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असुन शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक म्हसवडकर नागरीकाने स्वत: ची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!