फलटण नगराध्यक्षपदासाठी ‘नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकर’; श्रीमंत अनिकेतराजे आणि समशेरसिंह यांचे अर्ज दाखल


स्थैर्य, फलटण, दि. 17 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दोन हाय व्होल्टेज अर्ज दाखल झाले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या वतीने, तर खासदार गटाकडून भारतीय जनता पार्टीतर्फे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दोन्ही उमेदवारांनी आज आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी ३ वाजता संपण्यापूर्वीच दोन्ही प्रमुख गटांनी आपापले उमेदवार जाहीर करत अर्ज भरल्याने, आता फलटणच्या राजकीय आखाड्यातील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

लढाई ‘नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकर’

या अर्जांमुळे फलटणच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. यंदाची नगराध्यक्षपदाची लढत ही थेट ‘नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकर’ अशी होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत हाय होल्टेज ठरणार आहे. दोन्ही नेते हे नाईक निंबाळकर असले तरी, त्यांच्यात होणारी ही थेट लढत राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणार आहे.

गत अनेक वर्षांपासून फलटणच्या जनतेच्या मनात असलेला राजकीय समजही (की दोन्ही नाईक निंबाळकर समोरा समोर लढत नाहीत) यंदाच्या निवडणुकीत पुसून निघाला आहे. दोन्ही नेते प्रथमच नगराध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. श्रीमंत अनिकेतराजे यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर तर समशेरसिंह यांनी ‘कमळ’ चिन्हावर अर्ज भरल्याने, दोन्ही गटांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

अर्ज दाखल केल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी राजकीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवले. अर्ज दाखल झाल्यानंतर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः पुढे होत श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. त्यांनी अनिकेतराजे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्याशी हस्तांदोलन (शेकहॅण्ड) केले.

राजकीय वैर बाजूला ठेवून दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीचे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून आणि उपस्थित नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. या एका कृतीमुळे फलटणच्या राजकीय वातावरणातील तणाव काहीसा निवळल्याची भावना व्यक्त होत आहे.

आज दिवसभर दोन्ही गटांच्या प्रमुख नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही आपापले अर्ज दाखल केले. आता अर्ज छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, नगराध्यक्षपदाच्या या थेट लढतीमुळे फलटण नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


Back to top button
Don`t copy text!