स्थैर्य, सातारा, दि.२० : कोरोनाचे सावट असल्याने मिरवणूक न काढता सोशल डिस्टन्सिंगसह सर्व काळजी घेत शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेला नागफडी उत्सव चाफळ (ता. पाटण) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी न करता प्रथमच हा उत्सव भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
चाफळ येथे अनेक वर्षांपासून नागफडीचा उत्सव साजरा केला जातो. दिवाळीत होणाऱ्या या उत्सवास दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरवात होते. लाकडाच्या आकाराची नागफडी बांधून त्यास वरच्या रुंद बाजूस ताजे ऊस लावून त्यास फडीचा आकार आणतात. त्यावर आणि खालील बाजूस शोभेच्या वस्तू लावून फडी सजविली जाते, तर भाऊबीजेला प्रत्येक आळीत मोठी फडी तयार केली जाते. त्या फड्याही याच साहित्याने सजवल्या जातात. रानफुलांच्या माळांनीही फडी सजविण्यात येते. या शोभेच्या वस्तूंसाठी हजारो रुपये खर्च केला जातो. या सजावटीमुळे नागफडीचे 150 किलोपर्यंत वजन भरत असे. पूर्वीच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात दाट जंगल होते. त्या जंगलातून शेतकऱ्यांना डोंगररानात जावे लागे. त्या वेळी नाग, सर्पांकडून त्रास होऊ नये, यासाठी नागदेवतेची पूजा केली जात असे. त्यातूनच पुढे नागफडी उत्सव सुरू झाला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बालगोपाळ फडी तयार करतात. गावामध्ये प्रत्येक घरापुढे सायंकाळी फडी नेतात. नागदेवतेला प्रसन्न करणारी गीते म्हटली जातात. भाऊबीजेला ग्रामदेवता नांदलाईची यात्रा असते. याच दिवशी मोठ्या फड्या तयार करून त्यांची मिरवणूक काढली जाते. गावातील तिन्ही विभागांची स्वतंत्र फडी असते. त्यांच्यात फडी सजविण्यात चुरस असे. वरची, खालची आणि मधली आळी असे तीन विभाग यामध्ये सक्रिय होतात.
भाऊबीजेला रात्री मिरवणूक काढून फड्या नांदलाई मंदिरापासून आपापल्या आळीत नेल्या जातात. तेथे सुवासिनी नागफडीची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी सायंकाळी फड्यांची मिरवणूक काढून त्यांचे विसर्जन केले जाते. या फड्या तयार करण्यासाठी चाकरमानेही योगदान देतात. स्वेच्छेने आणि उत्साहाने नागरिक फडी सजविण्यासाठी खर्च करतात. चाफळचा हा नागफडीचा उत्सव इतरत्र कोठेही आढळत नाही. हा उत्सव म्हणजे चाफळचे वैशिष्ट्य आहे. हा उत्सव नुकताच उत्साहात झाला. मात्र प्रशासनाच्या निर्बंधामुळे नागफडीची मिरवणूक काढली नाही. युवकांनी छोटी नागफढी प्रत्येक घरापुढे फडीची गीते म्हणत प्रत्येक घरापुढे पूजनासाठी नेली होती. त्याबरोबरच भाऊबीजेदिवशी ग्रामदेवता नांदलाईदेवीची यात्रा असते. माथनेवाडी येथील भैरोबा व नांदलाई देवीची रात्री दहा ते पहाटेपर्यंत पालखीतून ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. मात्र, यावर्षी हा कार्यक्रमही रद्द केला होता. फक्त महिलांनी ग्रामदेवतांचे देवळातच पूजन करून यात्रा साजरी केली. नागफडी व ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण नेहमी केली जाते, तसेच फटाक्यांची आतषबाजीही जोरात केली जाते. मात्र, यावर्षी प्रशासनाच्या निर्बंधामुळे ग्रामस्थांनी अत्यंत साधेपणाने धार्मिक कार्यक्रम केला. त्यामुळे गुलालाच्या उधळणीविनाच यात्राही झाली.
नागफडी उत्सवासाठी नागफडी तयार करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. कार्यकर्त्यांना किमान तीन-चार दिवस त्या कामाला जुंपून घ्यावे लागते. आता कार्यकर्त्यांत एवढा वेळ देण्याइतका उत्साह राहिला नाही. यामुळे हळूहळू नागफडी उत्सव बहरणे कमी होऊ लागले आहे. गावातील तीन विभागांच्या तीन फड्या असत. या वर्षी एकच नागफडी तयार करण्यात आली होती. या एका फडीनेही गावात उत्सवाला बऱ्यापैकी रंगत आणली होती.