
फलटणमधील सोमवार पेठ येथे ‘नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रा’चे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मोफत आरोग्य तपासणी, वाचनालय आणि शहरात ५० नवीन स्ट्रीट लॅम्प उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
स्थैर्य, फलटण, दि. १४ मार्च : फलटण नगरपरिषदेच्या अंतर्गत सोमवार पेठ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रा’चे उद्घाटन माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण सोहळ्यास उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखील जाधव, बांधकाम समितीचे सभापती सोमाशेठ जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे आणि भीमदेव बुरुंगले यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरवाडी गटाच्या आशा गटप्रवर्तक सौ. सारिका घार्गे यांनी केले.
विकासाचा आरसा जनतेला दाखवा; रणजितदादांचे आवाहन
या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहराच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, फलटण शहराच्या प्रत्येक वॉर्डात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज सुरू होत असलेले हे केंद्र नक्कीच मोलाचे काम करेल. उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी पुढाकार घेत प्रभागनिहाय आरोग्य शिबिरे घ्यावीत आणि त्याची सुरुवात महिलांच्या तपासणीने करावी. महिलांच्या सर्वसाधारण आजारांपासून ते अगदी कॅन्सरपर्यंतच्या सर्व चाचण्या व उपचार जागेवरच झाले पाहिजेत. यात प्रामुख्याने रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब आणि वारंवार होणाऱ्या डोकेदुखीचे मूळ शोधण्यासाठी डोळे तपासणी शिबीर राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. मागील सत्ताधाऱ्यांकडे विकासाची इच्छाशक्तीच नव्हती, याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आधीचा फलटण-बारामती रस्ता आणि आताचा रस्ता यातील फरक जनतेला जाणवत आहे. आपण केलेले काम जनतेला ‘आरसा’ म्हणून दाखवण्याची गरज आहे. सोमवार पेठ (प्रभाग क्रमांक १) येथून सुरू झालेला हा विकास शहराच्या शेवटच्या प्रभाग क्रमांक १३ (हडको कॉलनी) पर्यंत पोहोचवायचा असून, जुने गावठाण, लक्ष्मीनगर, विद्यानगर, शिवाजीनगर यांसह कोणताही भाग विकासापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, याच आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वरच्या मजल्यावर नागरिकांसाठी वाचनालय सुरू करण्याचे आणि शहरात नव्याने ५० ‘स्ट्रीट लॅम्प’ बसवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देशही रणजितदादांनी दिले.
आरोग्यावरील ५०० रुपयांचा खर्च आता शून्य : नगराध्यक्ष समशेरसिंह
यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, फलटण शहरात यापूर्वी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे नगरपालिकेने कधीही गांभीर्याने बघितले नव्हते. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वॉर्डातच दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पूर्वी सोमवार पेठेतून शहरात उपचारांसाठी गेल्यावर ओपीडी, औषधे आणि रिक्षाभाडे असा सुमारे ५०० रुपये खर्च येत होता, मात्र या केंद्रामुळे आता हा खर्च शून्य रुपये झाला आहे. आगामी काळात या केंद्रात रक्त, लघवीपासून ते अगदी कॅन्सरपर्यंतच्या सर्व तपासण्या याच ठिकाणी मोफत करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा : उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले
उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, फलटण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्यासाठी साधी जागाही उपलब्ध करून दिली गेली नव्हती, ही मोठी शोकांतिका होती. परंतु आता रणजितदादा व समशेरदादा यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्यवर्धिनी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनीही मनोगत व्यक्त करताना, शहराच्या दुर्लक्षित भागात आरोग्य सुविधा पोहोचवून रणजितदादा व समशेरदादा शहराच्या विकासाची गती वाढवत असल्याचे मत व्यक्त केले.
शहरात एकूण चार आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारणार : डॉ. संतोष कोंडके
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी प्रास्ताविकातून नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राची सविस्तर माहिती दिली. शहरात एकूण ४ आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करायची होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून यासाठी जागा मिळत नव्हती. आता नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि अशोकराव जाधव यांच्या मोलाच्या साथीमुळे जागांचा प्रश्न सुटला आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणारी सेवा आता शहरात मोफत मिळणार असून, यामुळे उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल. दत्तनगर येथील जुन्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जागेत लवकरच तिसरे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले जाणार असून, त्यासाठी नगराध्यक्षांनी तातडीने जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती डॉ. कोंडके यांनी दिली.

