दैनिक स्थैर्य | दि. 14 जानेवारी 2025 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणने नॅक (नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल) तर्फे A मानांकन प्राप्त केले आहे, यासोबतच एनबीएची अधिस्वीकृती मानांकन मिळाले आहे. या निमित्त गुरुवार, जानेवारी 16, 2025 रोजी फलटण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात माजी आमदार दिपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्राचार्य विश्वासराव देशमुख, रमणलाल दोषी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नॅकचे A मानांकन प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होतील आणि महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, असा विश्वास महाविद्यालयाच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक सुधारणांवर महाविद्यालयाचा सतत प्रयत्न असतो.
फलटण येथील नागरिकांनी या विशेष सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. हा सोहळा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला जाणार आहे.
नॅकचे A मानांकन प्राप्त झाल्याने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या करियरच्या संधी वाढतील. यामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढून शैक्षणिक क्षेत्रात ते एक आदर्श बनेल.