सर्व सामन्यांमध्ये जनजागृती व विश्वास  निर्माण करण्यासाठी माझा वॉर्ड, माझी जबाबदारी अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्वराज कोविड योद्धा सन्मानपत्र वितरण करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप शेजारी तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगरसेवक अशोकराव जाधव, प्रा. सतीश जंगम वगैरे.

स्थैर्य, फलटण दि. १४ : कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जागृती करुन त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शासनाने सुरु केलेले ‘माझा वॉर्ड, माझी जबाबदारी’ अभियान सर्वस्तरातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.

फलटण शहरातील प्रभाग क्र. ३, ४ व ५ मधील या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक अशोकराव जाधव होते. यावेळी तहसीलदार समीर यादव, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, डॉ. शीतल सोनवलकर, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अनुप शहा, नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. मदलसा कुंभार, सौ. मीना नेवसे माजी नगरसेवक डॉ. आगवणे उपस्थित होते.

अभियानाद्वारे मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न

अभियानाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग टाळणे विषयी माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून त्याचबरोबर या भीषण आजारामुळे सध्या असलेले मृत्यूचे दोन ते अडीच टक्के प्रमाण कमी करण्यासाठी होणारे प्रयत्न निश्चित फायदेशीर ठरतील असा विश्वास प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी व्यक्त केला. 

अभियानाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करा : प्रांताधिकारी

कोरोना लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ उपचार घेतल्यास ते यातून बाहेर पडू शकतात, त्यामुळे कोरोना मुक्तीचे प्रमाण वाढू शकते याची ग्वाही देत त्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असून त्याच्या यशस्वितेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी केले.

अभियान यशस्वीतेसाठी उत्तम नियोजन केल्याची ग्वाही

मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी माझा वॉर्ड, माझी जबाबदारी या अभियानांतर्गत फलटण शहरातील नगरसेवक/नगरसेविकांचे सहकार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने लाभत असल्याचे सांगून, याकामी कर्मचाऱ्यांचे २५ गट तयार केले असून, बारा वॉर्ड ऑफिसर त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसात जवळ जवळ ९२ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून लक्षणे दिसणार्‍या ४०० ते ५०० जणांची तपासणी केल्यानंतर ४० बाधीत आढळले त्यांच्यावर उपचार चालू असून अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

लक्षणे न लपविता तपासणी करुन घेणे आवश्यक

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण आपली लक्षणे लपवीत असून हे घातक आहे व त्याचा परिणाम त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबावर होत असल्याने लोकांच्यामध्ये जागृती करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन करतानाच या अभियानाचा दुसरा टप्पा दि. १५ ते २५ ऑक्टोबर पर्यंत पार पडणार असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी निदर्शनास आणून दिले.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वांची एकजूट महत्वाची

अभियान शहराप्रमाणे ग्रामीण भागातही राबविण्यात येत असल्याचे नमूद करीत या अभियानाद्वारे शहर व तालुक्यातून कोरोनाचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी शासन, प्रशासन, लोकांची एकजूट अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

प्रारंभी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात माझा वॉर्ड, माझी जबाबदारी अभियानाविषयी माहिती देऊन या ३ प्रभागात अभियान अंमलबजावणीसाठी केलेले नियोजनाविषयी माहिती दिली व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

स्वराज कोविड योद्धा सन्मानपत्र

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कार्यरत नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यांना स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून ‘स्वराज कोविड योद्धा’ प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी समारोप व आभार नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!