दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । सातारा । कोरोना महामारीत लाखमोलाचे जीव डॉक्टरांनी वाचवले. पण या डॉक्टरांच्या हालअपेष्टांकडे मात्र काणाचे लक्ष नाही. पीपीइॅ किट घालून अथक सेवा, पुरेशी झोप – विश्रांती – आहार नाही. उलट साखळी इस्पीतळांच्या नफेखोरीचा सगळा राग डॉक्टरांवर काढून त्यांच्यावर होणारे हल्ले हे लाजीरवाणे वास्तव पहावे – ऐकावे लागत आहे.
आठ – नऊ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टरांना चांगले पगार, चांगल्या सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यांची सरकारही तशी काळजी घेत नाही. वैद्यकीय शिक्षण प्रचंड महागडे आहे. त्यानंतर स्वत:चे हॉस्पिटल उभे करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते आणि अशा बाजारीकरणात त्यांनी स्वस्तात सुश्रुषा करावी, अशी अपेक्षा बाळगली जाते. डॉक्टरांची अपुरी संख्या, पायाभुत सुविधांचा अभाव, औषधांची कमतरता, कालबाह्य तंत्रज्ञान आणि सरकारी धोरणात प्राधान्य नाही. अशा संकटात सापडलेल्या आरोग्य क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब आहे.
काळाची गरज ओळखून आघाडी सरकारने आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी हेल्थकेअर नर्सिंग, पॅरामेडीकलच्या 20 हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार आता स्वतंत्र विशेष विभाग सुरु करणार असल्याने डॉक्टरांचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करणे श्रेयस्कर ठरेल, असे मनोमन वाटते. केंद्र सरकारनेही कोरोना विरोधात लढण्याकरिता 23 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान जनतेपुढे व सरकारपुढे आहेच.
यासाठी एवढेच म्हणता येईल, ‘सावधान, सावधान आता घचायचं नाय गड्या लढायचं हाय, सरकारच्या अन् डॉक्टरांच्या साथीने कोरोनावर मात करायची हाय !’
– बी. बी. पवार (वर्णेकर),
वर्णे, ता. जि. सातारा.
मोबा. 9860297118