स्थैर्य, पुणे, दि २६: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर सिंधुताई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास पुरवण्यासाठी आहे, मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा’ माई तुमची आभारी आहे, असे म्हणत सिंधुताईंनी केंद्र सरकारचे आभार मानले.
सिंधुताई म्हणाल्या की, ‘माझी मुले आनंदी आहेत. मात्र भूतकाळ विसरता येत नाही. मी भूतकाळाला मागे टाकत मुलांचे वर्तमान सांभाळण्याचे काम करत आहे. मला नेहमीच तुमचे (माध्यमे) समर्थन मिळत आले. तुमच्या मदतीमुळे मला हे जग ओळखत आहे.’ माई पुढे म्हणाल्या की, ‘माझी भूख आणि माझी भाकर या माझ्या प्रेरणा आहेत. मी या भाकरीचे आभार मानते कारण जेव्हा माझ्या खिशात पैसे नव्हते अशा वेळी या लोकांनी मला साथ दिली. हा पुरस्कार माझ्या मुलांसाठी आहे ज्यांनी मला जगण्याची ताकद दिली.’