स्थैर्य, ठाणे दि.१: निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण , वनसंवर्धन , घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण याबाबत काम करणे. वायु तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधार करणे. जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धन , सागरी जैव विविधता , जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे. अग्नी तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर , ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे , अपारंपारिक ऊर्जेच्या निमिर्तीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम , महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा , पडीक जमीन, शेतांचे बांध यासारख्या जागांचा उपयोग करून घेणे तर आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात जनजागृती करणे या बाबींचा समावेश आहे.
निसर्गाच्या या पंचतत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबाधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.
हे अभियान 667 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये अमृत शहरे 43 , नगरपरिषदा 226 , नगरपंचायती 126 , दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 246 ग्रामपंचायती व रायगड , रत्नागिरी व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती नसल्याने या जिल्ह्यात ही अट शिथिल करून पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे.
हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकांचे आयुक्त , नगरपरिषदांचे / नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामसेवक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यांच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रमुख म्हणून संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबधित महसुली विभागाचे प्रमुख म्हणून विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून या अभियानात उच्चतम कामगिरी करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अभियानाचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण 1 हजार 500 गुण ठेवण्यात आले असून त्यामध्ये हरित अच्छादन व जैवविविधता , घनकचरा व्यवस्थापन , वायु गुणवत्ता , जलसंवर्धन , रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी , तळे व नाले यांची स्वच्छता , सांडपाणी मैला व्यवस्थापन व प्रक्रिया , सौर ऊर्जा , हरित इमारतींची संख्या , पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती व निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ या बाबींचा अंतर्भाव केला आहे. या बाबींचे मूल्यमापन 01 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. याचा निकाल व बक्षीस वितरण 05 जून 2021 जागतिक पर्यावरण दिनी करण्यात येणार आहे.
यामध्ये मूल्यमापनातील गुणानुसार प्रथम येणारी तीन अमृत शहरे , तीन नगरपरिषदा , तीन नगरपंचायती , तीन ग्रामपंचायती यांचा समावेश असणार आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एका विभागीय आयुक्ताला , तीन जिल्हाधिकाऱ्यांना व तीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे.