स्थैर्य, फलटण, दि. २० : आईला मारहाण केली म्हणून धारदार सत्तूरने व पाणी सोडण्याच्या लोखंडी पान्याने वार करून एकाचा खून केल्याची घटना सस्तेवाडी, ता. फलटण येथे घडली. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. 19 रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास सस्तेवाडी गावच्या हद्दीत दातेवस्ती येथे गणेश हणमंत सावंत, वय 35, रा. दातेवस्ती, सस्तेवाडी, ता. फलटण याने संशयित अविनाश सावंत याला शेळीचे दूध काढण्यासाठी बोलवले असता तो आला नाही. त्यामुळे गणेश सावंत याने संशयिताच्या आईबरोबर भांडण केले. त्या भांडणाचा राग मनात धरून संशयित अविनाश सावंत याने गणेश सावंत याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याला सत्तूर व पाणी सोडण्याच्या लोखंडी पान्ह्याने (चावी) वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद कल्पना हनुमंत सावंत यांनी दिल्यानंतर अविनाश मल्हारी सावंत याला पोलिसांनी अटक केली तर विजय मल्हारी सावंत याला ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडल्यापासून 1 तासाच्या आत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्वाती धोंगडे, पोलीस हवालदार दत्तात्रय कदम, पोलीस हवालदार रामदास लिमन, पोलीस हवालदार राजेंद्र फडतरे, पोलीस नाईक राजेंद्र गायकवाड, हरिभाऊ धराडे, संजय देशमुख, राजकुमार देवकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे, निखिल गायकवाड, गणेश अवघडे यांनी संशयितांची गोपनीय माहिती घेवून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. सोनवणे तपास करत आहेत, असे हि फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने माहिती देण्यात आली.