स्थैर्य, सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : शहरालगतच्या खिंडवाडीतील जंगलात आढळून आलेल्या मृतदेहाचा छडा सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने दोनच तासात लावला आहे. संबंधित युवकाचा खून त्याच्याच आईच्या सांगण्यावरून झाचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आईलाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खिंडवाडीतील जंगलामध्ये बुधवारी दुपारी एका युवकाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. या युवकाच्या डोक्याजवळ दगड आणि रक्त दिसून आले. सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. प्रकाश कदम (वय 30, रा. वळसे, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी केवळ दोन तासांत संशयित आरोपी साहिल मुलाणी आणि प्रमोद साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) या दोघांनाही अटक केली. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रकाशच्या आईच्याच सांगण्यावरून हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
प्रकाश कदम दारू पिऊन वारंवार त्याच्या आईला त्रास देत होता. काही वर्षे तो मुंबईमध्ये काम करत होता. मात्र, गावी आल्यानंतर परत जातच नसे. गावी काहीही काम न करत तो दारू पिऊन आईला शिवीगाळ करत होता. या त्रासाला त्याची आई कंटाळली होती. त्यामुळे आईने नात्यातील प्रमोद साळुंखे याला त्याचा कायमचा काटा काढण्याचे सांगितले. त्यानुसार प्रमोदने त्याचा मित्र साहिल याला सोबत घेतले. 26 ऑगस्ट रोजी दुपारी तिघेजण दारू पिण्यासाठी खिंडवाडीतील जंगलामध्ये गेले. या ठिकाणी प्रकाशला दारू पाजल्यानंतर दोघांनी प्रकाशचा गळा चिरला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृर्ण खून केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुजित भोसले, दादा परिहार, सागर निकम, नितीनराज थोरात, सतीश पवार, संदीप कुंभार यांनी केली.