स्थैर्य, मुंबई, दि.१५: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष म्हणून गांभीर्याने विचार करावा लागेल. या प्रकरणात न्यायालय आणि पोलिस काय कारवाई करायची ती करतील. पण, पक्ष मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे मुंडे यांची राज्याच्या मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
बाॅलीवूड गायिका रेणू शर्मा हिने केलेले अत्याचाराचे आरोप आणि मुंडे यांनी स्वत: दिलेली लिव्ह इन रिलेशनशिपची कबुली यासंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या भाष्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात गुरुवारी गतिमान हालचाली झाल्या. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली. दुपारी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक झाली. बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेटीला गेले. उभय नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आहे. त्या बैठकीत मुंडे यांचे भवितव्य ठरणार आहे.
काय म्हणाले शरद पवार
लिव्ह इनबाबत बोलण्यासारखे नाही…
गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुंडे यांच्यावरील आरोपांसंदर्भात बोलताना पवार म्हणाले, धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरून त्यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना मुंडे यांना होती. त्यामुळेच मुंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करून घेतला होता. या प्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही.
मुंडेंबाबत लवकरच निर्णय
मुंडे यांच्यावरील अत्याचाराच्या आरोपांबाबत बोलायचे झाल्यास ते गंभीर स्वरूपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी माझे अद्याप बोलणे झालेले नाही. मात्र, मी त्यांना विश्वासात घेऊन मुंडे यांनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ. त्यासाठी फार वेळ लागणार नाही.
मलिक यांच्या जावयाच्या घराची झाडाझडती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केल्यानंतर एनसीबीने गुरुवारी त्यांच्या मुंबईतील घराची झाडाझडती घेतली. मात्र, त्यात काही आक्षेपार्ह हाती लागले नाही. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे सबळ पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. दरम्यान, समीर खान यांना न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.
राजीनामा दिला नाही, पक्षानेही मागितला नाही
बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या शिरस्त्याप्रमाणे ‘जनता दरबार’ घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता. मुख्यालयातून बाहेर पडताच प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारला असता आपण राजीनामा दिलेला नाही किंवा पक्षानेही राजीनामा देण्यास सांगितले नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्याची आवश्यकता नाही : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. पण, याप्रकरणी राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची आवश्यकता नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.