स्थैर्य, दि.९: मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की मुंबईत बनावट टीआरपी रॅकेट उघडकीस आले आहे. काही चॅनेल खोट्या टीआरपीचे रॅकेट चालवत आहेत. हे लोक नंबर एक होण्यासाठी पैसे देऊन खोटी टीआरपी गोळा करतात. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकसह तीन वाहिन्यांची नावे चौकशीत उघड झाली आहेत. त्यांना समन पाठवून चौकशीसाठी बोलावले जाईल.
गुन्हे शाखेने रॅकेट उघडकीस आणले
आयुक्त म्हणाले की आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही वाहिन्या खोटी टीआरपी गोळा करून टीआरपीमध्ये फेरफार करत आहेत. बनावट नंबर गोळा करून न्यूज चॅनेल प्रथम क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन छोट्या वाहिन्यांच्या मालकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रिपब्लिक चॅनलचे प्रमोटर आणि संचालकांविरोधात चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांनी कबूल केले आहे की रिपब्लिक टीआरपी वाढविण्यासाठी पैसे देत होते.
टीआरपी गेम कसा सुरू होता?
आयुक्तांनी सांगितले की तपासणी दरम्यान अशी घरे सापडली आहेत जेथे टीआरपी मीटर बसवण्यात आले होते. या घरातील लोकांना पैसे देऊन दिवसभर एकच चॅनेल चालवले जात होते, जेणेकरून चॅनेलची टीआरपी वाढेल. ते म्हणाले की, काही घरे असे आहेत जे बंद असूनही तिथे टीव्ही सुरू राहायचा. एका प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्तांनी असेही सांगितले की चॅनल किंवा एजन्सीकडून या घरातील लोकांना दिवसाला 500 रुपयांपर्यंत पैसे दिले जात होते.
सखोल चौकशी केली जाणार
आयुक्त म्हणाले की, आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली गेली आहे. रिपब्लिक आणि दोन स्थानिक चॅनलचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. रिपब्लिक चॅनलचे डायरेक्टर, प्रमोटर्सला समन पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येईल. ते म्हणाले की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. इतर काही नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.