स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (1 फेब्रुवारी) 2021 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदा बजेटमध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे आणि मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे रेल्वे डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोअर, NHAI चे टोल रोड आणि विमानतळासारख्या ठिकाणांना असेट मॉनिटायझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी त्यांनी जुन्या गाड्यांना स्क्रॅप केले जाणार असून त्यामुळे प्रदुषण नियंत्रणात येईल, असे म्हटले आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. आठ हजार किलोमीटरपर्यंतचे कंत्राट मार्च महिन्यापर्यंत देण्यात येतील. रोड इन्फ्रा आणि इकॉनॉमिक कॉरिडोअरवर काम सुरु आहे. सध्या तामिळनाडूत 3 हजार 500 किमीचे रस्ते तयार होत आहेत. यात मदुरै-कोल्लम कॉरिडोअरचाही समावेश आहे, असे सीतारमन यांनी सांगितले.
सोबतच त्या पुढे म्हणाल्या, केरळमध्ये 1100 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी 65 हजार कोटी रुपये खर्च होतील. मुंबई – कन्याकुमारी कॉरिडोअरचाही यात समावेश असेल. याशिवाय 6500 किलोमीटर लांबीचा महामार्ग बंगालमध्ये तयार केला जाईल, यावर 25 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. यामध्ये कोलकाता-सिलिगुडी रस्त्यांची डागडुजीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.