महसूलमंत्री बावनकुळेंची आमदार निवासाला भेट – जुन्या आठवणींचा उलगडा


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील कामकाज आटोपल्यानंतर आकाशवाणी आमदार निवासाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

स्थैर्य, मुंबई, दि. ०९ एप्रिल : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील कामकाज आटोपल्यानंतर आकाशवाणी आमदार निवासाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील तब्बल ११ वर्षे व्यतीत केली होती. या दीड तासांच्या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

जुन्या आठवणींचा उलगडा

आमदार निवासात प्रवेश करताच बावनकुळे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वप्रथम सुरक्षा रक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर कँटीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. लोकांना चांगली सेवा द्या आणि अन्नाचा दर्जा उत्तम ठेवा, अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. लिफ्टने वर जात असताना लिफ्टमनशी केलेली त्यांची आपुलकीची चर्चा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

रूम नंबर ३१७ आणि संघर्ष

यावेळी ते म्हणाले, “मी या आमदार निवासातील रूम नंबर ३१७ मध्ये राहायचो. अनेकदा गर्दी असल्याने कित्येक रात्री मी व्हरांड्यातही झोपून काढल्या आहेत.” त्या संघर्षाच्या काळात कधीही हार मानली नाही, तोच अनुभव आणि कष्ट इथपर्यंत घेऊन आल्याचे बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले.

आमदारांच्या सुविधेसाठी पुढाकार

सहाव्या मजल्यावरील रूम नंबर ६०१ मध्ये त्यांनी आमदार चरणसिहं ठाकूर आणि आमदार उमेश यावलकर यांच्यासह जुन्या मित्रांची भेट घेतली. आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांना मिळणाऱ्या रूम्सचा आकार सध्यापेक्षा थोडा मोठा असणे आवश्यक आहे. जेणेकरून कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल, यासाठी संबंधितांशी बोलून अडचणी मार्गी लावू, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!