
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव रंगणार असून ४२ कलाप्रकार सादर होणार आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑक्टोबर : शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात ६ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून फलटण नगरीत कला, संस्कृती, साहित्य, संगीत आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा
महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. जे. पी. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, प्रा. डॉ. बी. एस. सातपुते आणि विद्यार्थी विकास विभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे उपस्थित राहणार आहेत.
४२ कलाप्रकार आणि भव्य शोभायात्रा
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लोकसंगीत, लोकनृत्य, नाट्य, वक्तृत्व, सुगम गायन, रांगोळी आणि छायाचित्रण अशा ४२ विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी २ वाजता महाविद्यालयाच्या मैदानापासून मुख्य व्यासपीठापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल.
समारोप व पारितोषिक वितरण
शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप व पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.



