दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा, पंजाब येथे दि. ६ ते ८ एप्रिल २०२३ दरम्यान भारतीय युवा महोत्सव संघटना ‘वन वर्ल्ड २०२३’ आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला होता. त्यात भारतातून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघातून लोकनृत्य, लोकसंगीत, वाद्यवृंद व सांस्कृतिक रॅली या संघात मुधोजी महाविद्यालयाचे कलाविष्कार विभागाचे दोन गुणी विद्यार्थी कलावंत ओम पोपट शिंदे, ओंकार राजेंद्र दाणे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात भारताला सुवर्णपदक मिळवून उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावला व विजयपताका फडकविली.
या संघाबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विकासचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, वरिष्ठ सहायक श्री. मोरे, आडके मॅडम, संघव्यवस्थापक प्रोफेसर डॉ. टी. पी. शिंदे यांचा सहभाग होता.
कलाविष्कार विभागातील विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग कामगिरीचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी विद्यार्थ्यांना कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर, प्रा. विशाल गायकवाड, प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.