72 गावांमध्ये देखभाल व दुरुस्तीसह नवीन वीजजोडणीचे 2553 कामे पूर्ण
स्थैर्य, सातारा, दि. 22 : एकाच गावात दिवसभर वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसह नवीन वीजजोडणी व वीज बिलासंदर्भात विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या बारामती परिमंडलातील ‘एक गाव एक दिवस’ उपक्रमातून गेल्या तीन महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील 72 गावांमध्ये वीजविषय विविध प्रकारचे 2553 कामे करण्यात करण्यात आली आहेत.
बारामती परिमंडलामध्ये मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी हा उपक्रम सुरु करण्यात आला. साधारणतः मार्च ते जूनपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी होते. यामध्ये मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह नवीन वीजजोडणी देणे तसेच वीजबिलासंदर्भात तक्रारींचा निपटारा थेट गावातच केला जातो. यंदा बारामती परिमंडलामध्ये सोलापूर, सातारा जिल्ह्यासह बारामती मंडलमधील 295 गावांमध्ये अशा प्रकारची एकूण 23,035 कामे करण्यात आली आहेत. वीजसुरक्षा व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिशय प्रभावी या उपक्रमाची दखल घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वाई विभाग- 32, फलटण विभाग- 25, वडूज विभाग- 6, सातारा विभाग- 5 व कराड विभागातील 4 अशा एकूण 72 गावांमध्ये ‘एक गाव एक दिवस’ उपक्रमातून रोहित्रांतील तेलाची पातळी वाढविणे, गंजलेले व सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, सुरक्षिततेसाठी वीजवाहिन्यांना स्पेसर्स किंवा पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, लोंबकळणाऱ्या वीजतारांचे झोल काढणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची दुरुस्ती तसेच क्लिनिंग व झाकणे लावणे, नवीन किटकॅट बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, नादुरुस्त सर्व्हीस वायर बदलणे, रोहित्रांच्या केबल बदलणे, नवीन वीजजोडण्या देणे, सदोष मीटर बदलणे, मीटर शिफ्टींग आणि वीजबिलांची दुरुस्ती आदी 2553 कामे करण्यात आली आहेत.
यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे नवीन वीजजोडणीचे शिबिर आयोजनाला मर्यादा आल्या होत्या. मात्र प्राप्त झालेल्या अर्जांप्रमाणे नवीन वीजजोडणी व वीजबिलांच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. याशिवाय जूनमध्ये लॉकडाऊन कालावधीनंतर रिडींगप्रमाणे देण्यात आलेल्या बिलाबाबतचा संभ्रम देखील काही गावांमध्ये या उपक्रमातून दूर करण्यात आला. या उपक्रमामुळे गावांतील वीजविषयक प्रश्न व समस्या दिवसभरातच मार्गी लागत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. सुनील माने, संजय सोनवलकर (वाई), अभिमन्यू राख (कराड), मंदार वाग्यानी (फलटण), सोमनाथ मुंडे (वडूज) यांच्यासह अभियंते व जनमित्रांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.