दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । मुंबई । महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) तथा मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांच्या कार्यपद्धती आणि वर्तणुकीच्या अनुषंगाने शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांना निलंबित करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य सर्वश्री ज्ञानराज चौगुले, सुनिल प्रभू, अबू आझमी आदी सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, सुमित कुमार हे पूर्वी केंद्र सरकारमध्ये नोकरीला होते ते सरळसेवेने महावितरणमध्ये उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) या पदावर रुजू झाले असून त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. आता ते कोकण प्रादेशिक कार्यालयात कार्यरत आहेत. सुमितकुमार यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त झाल्या असून संपूर्ण तक्रारींची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश महावितरणला दिल्याचेही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
महावितरणचे तत्कालीन संचालक दिनेश साबू यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून भ्रष्टाचार, वीज खरेदीमध्ये घोटाळा, भूखंडांमध्ये गैरव्यवहार, पॉवर ट्रेडिंग इत्यादीसंदर्भात असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करुन गुन्हे दाखल केले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी साबू यांच्याविरोधातील आरोपात सकृतदर्शनी तथ्य असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून साबू यांच्यावरील आरोपांची चौकशी करुन त्याचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.