दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला विश्वास जगदाळे यांना जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात मोठ्या सन्मानाने देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ मुंबई महामंडळाचे राज्यस्तरीय ६२ वे अधिवेशन फैजपूर, जळगाव येथील जे. टी. महाजन महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दिलीप केसरकर, कोकण विभाग शिक्षण मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सौ. जगदाळे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व फेटा देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना ना. दिपक केसरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापक संघ हे गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थी हितासाठी सातत्याने अधिवेशनामध्ये चांगले विषय घेऊन मंथन करतात. राज्यातील शिक्षकांच्या विविध मागण्या तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती दुप्पट करणे, शिक्षण सेवक मानधन, पुस्तकांचे ओझे कमी करणे तसेच विनाअनुदानित तसेच अंशत: अनुदानित शाळांना अनुदान याबाबत निर्णय घेतले असून इतर मागण्या लवकर पूर्ण केल्या जातील, असे सांगितले.
या पुरस्काराबाबत साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, विश्वस्त समिती अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील, संचालक राजेंद्र शेवाळे, राजेंद्र भोसले, कौशल भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे शिक्षक व अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई चे संपादक मोझर सर यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.