दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सरडे गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. प्रियंका नवनाथ धायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल फलटण तालुक्यातील सर्व क्षेत्रांमधून सौ. प्रियंका धायगुडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सरडे गावच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तरुण म्हणजेच वय वर्ष तेविसाव्या वर्षी सौ. प्रियंका नवनाथ धायगुडे ह्या सरपंच पदी विराजमान झालेल्या आहेत. सर्वात तरूण सरपंच गावाला मिळाल्याने गावचा संपुर्ण विकास साधण्यामध्ये नक्कीच सौ. प्रियंका धायगुडे कमी पडणार नाहीत, असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.
सरडे गावच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या सौ. प्रियंका नवनाथ धायगुडे यांचे शिक्षण बीएससी केमिस्ट्री व डीफार्मसी मध्ये झाले आहे. खरतर सरडे सारख्या ग्रामीण भागामध्ये लग्न झाल्यावर चुल व मुल या संकल्पनेमध्येच सर्व महिला अडकुन पडतात. परंतु सौ. प्रियंका धायगुडे यांनी लग्न झाल्यावर पदवीचे शिक्षण पुर्ण करत फार्मसीचे शिक्षण सुध्दा त्यांनी पुर्ण केले आहे. यासोबतच सरपंच पदी विराजमान होण्यापुर्वीच सरपंच पदाच्या कामकाजाचे प्रशिक्षण सौ. प्रियंका धायगुडे यांनी घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व सरडे गावचे सुखदेव बेलदार, सुरेश बेलदार, महादेव चव्हाण, नानासाहेब चव्हाण, तात्यासाहेब बेलदार, कांतीलाल बेलदार, हुसेन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसरपंच राजुभाई मगदुम करजगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सोबतीने सरडे गावचा संपुर्ण विकास साधण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही सौ. प्रियंका धायगुडे यांनी यावेळी दिली.