दैनिक स्थैर्य । दि. ०३ सप्टेंबर २०२२ । पुणे । रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी स्वा. सावरकर स्मृती आंतर-महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी द्वारा गेली १४ वर्षे स्वा. सावरकर स्मृती आंतर-महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजिन सातत्याने केले जात आहे. यंदा स्पर्धेचे हे १५ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयातील वादविवाद पटू या स्पर्धेत भाग घेत असतात. महाविद्यालयीन तरुणांनी राष्ट्रीय स्तरावरील तसेच समकालीन विषयांचा अभ्यास करावा, तसेच विषयाच्या दोनही बाजू अभ्यासण्याची वृत्ती त्यांच्यात विकसित व्हावी यासाठी प्रबोधिनी हि स्पर्धा आयोजित करत आलेली आहे. स्वा.सावरकर हे तरुणांचे प्रेरणास्थान असून, त्यांचे विचार यानिमित्ताने तरुणांनी अभ्यासून आत्मसाद करावेत यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
या वर्षी होणार्या आंतर-महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेसाठी ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास लेखनात क्रांतिकारकांवर नेहमीच अन्याय होत गेला आहे’ हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सहभागी स्पर्धाकांच्या संघापैकी एकाने सकारात्मक आणि दुसऱ्याने नकारात्मक बाजू मांडायची आहे. प्रत्येक स्पर्धकाला आपली बाजू मांडन्याकरिता १० मिनिटांचा कालावधी दिला जाणार असून त्यांच्या मांडणीचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत-जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक आणि सांघिक स्वरुपाची भरघोस पारितोषिके देण्याचे ठरवले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ११००१, द्वितीय पारितोषिक रु. ७००१, तृतीय पारितोषिक रु. ५००१ असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रत्येक संघासाठी नोंदणी शुल्क रु. ५५० असून नोंदणी करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२२ आहे. इच्छुकांनी यदुनाथ देशपांडे ९३४०३ ४२६९८ / राहुल टोकेकर ९८२२९७१०७९ / उत्तम पवार ८१०८० २४६०९ / अनिल पांचाळ ९९७५४१५९२२ या क्रमांकावर संपर्क करावा.
अमेय देशपांडे
वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी
८८८८८ ०३०७३