स्थैर्य, फलटण दि. 23: कोळकी, ता.फलटण येथील वाहन प्रशिक्षक सौ.आशा बापुराव जगताप यांनी 61 वर्षांच्या महिलेला दुचाकी चालवण्यात नुकतेच पारंगत केले असून ‘स्त्री जर धाडसी असेल तर तिला कोणतेही काम अवघड नाही’ असा संदेश त्यांनी यातून दिला आहे.
साप्ताहिक रामआदेशचे संपादक तथा फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य बापुराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ.आशा बापुराव जगताप या गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी वाहन प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी हॉटेल जित पॅराडाईचे मालक पोपटराव इंगळे यांच्या बहिण सौ.ताई शंकर भोसले (रा.कोळकी, ता.फलटण) वय 61 वर्षे या दुचाकी वाहन शिकण्याच्या हेतूने सौ.आशा जगताप यांच्याकडे आल्या. सौ.आशा जगताप यांनी हे आव्हान स्विकारुन अवघ्या काहीच दिवसात सौ.ताई भोसले यांना वयाच्या 61 व्या वर्षी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देवून त्यात पारंगत केले.
‘‘आजवर अनेक तरुणींना, महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण आपण दिले आहे. सौ.ताई भोसले यांना 61 व्या वर्षी प्रशिक्षीत करणे थोडेसे आव्हानात्मक होते. मात्र त्यांची जिद्द आणि प्रतिसाद यामुळे हे काम सोपे झाले. आजची स्त्री ही आत्मनिर्भर असणे आवश्यक असून महिलांना जर वाहन चालवता येत असेल तर त्या आपली अनेक कामे सहजरित्या करु शकतात. त्यामुळे त्यांनी आजच्या गतिमान युगात मनात कुठलीही भिती न बाळगता वाहन चालवण्यास शिकणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी आपल्याशी 8999338071, 9730039878 या क्रमांकावर संपर्क साधावा’’, असे आवाहन सौ.आशा जगताप यांनी यानिमित्ताने केले आहे.