दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
ज्ञानविकास मंडळ सातारा यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘आदर्श माता पुरस्कार’ यावर्षी ‘एबीपी माझा’चे संपादक विजय भिसे यांच्या मातोश्री सौ. रंजना मोहन भिसे (दालवडी, ता. फलटण) यांना जाहीर झाला आहे.
सौ. रंजना भिसे यांनी आपल्या मुलांबरोबर, दीरांची मुले यांनाही शिक्षण देऊन एक पिढी सशक्त केली आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असताना लहान भावांना शिक्षणासाठी आधार दिला व त्यांना घडवले. एक पिढी सशक्त घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची प्रेरणा घेऊन शेजारच्या कुटुंबामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. स्वतः अपार कष्ट करून मेहनतीने त्यांनी संसार करून मुले घडवली व समाजाला दिशादर्शक काम केले आहे. त्यामुळे त्यांची ‘आदर्श माता’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
सातारा येथील ज्ञान विकास मंडळ दरवर्षी खडतर परिस्थितीत जीवन जगून आपल्या मुलांना शिक्षण देऊन घडविणार्या, त्यांच्यावर चांगले संस्कार करणार्या अशा आदर्श मातांना पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. त्यांचे हे ३५ वे वर्षे आहे. आजपर्यंत ज्ञानविकास मंडळाने सुमारे १६० मातांना ‘आदर्श माता पुरस्कार’ देऊन गौरवले आहे. यावर्षीचा ‘आदर्श माता गौरव’ पुरस्कार कार्यक्रम दि. ११ एप्रिल २०२४ रोजी महिला मंडळ सभागृह, गांधी मैदान, राजवाडा येथे संध्याकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञान विकास मंडळ सातारा यांनी चार आदर्श मातांचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती ज्ञानविकास मंडळाचे अध्यक्ष यांनी केली आहे.