स्थैर्य, सातारा, दि. 22 : राष्ट्रवादीतून लोकसभेवर निवडून आलेल्या श्री. छ. उदयनराजेंनी काही महिन्यांतच आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. 3 एप्रिल रोजी त्यांची भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, आज दुपारी त्यांनी संसदेतील राज्यसभेच्या दालनात पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नूतन 61 राज्यसभा सदस्यांचा शपथसोहळा लांबला होता. दरम्यान, आज दुपारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले तसेच खा. शरद पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी राज्यसभेच्या 61 सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी ही शपथ इंग्रजीतून घेतली व आपल्या शपथेचा समारोप ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उद्घोषणेने केला. उदयनराजेंच्या शपथविधीनंतर साताऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.