दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । अखेर त्रुटी व अनियमितता आहे हे मान्य करुन सातारा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगरवाचनालयाचा विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा जाहीर केलेला कार्यक्रमच (२०२१ ते २०२६) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. आता नव्याने निवडणुक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.
मतदार यादीमधील त्रुटी , सदोष मतदार यादी , निवडणूक कार्यक्रम , छाननी नंतर अर्ज मागे घेण्याची मुदत , त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी हे सगळे सभासद मतदानांवर अन्याय करणारे , मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याच्या हरकतीचा अर्ज संस्थेचे आजिव सभासद विजय मांडके यांनी दाखल केल्यानंतर अर्ज छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित राहून त्यांनी श्री.छ. प्रतापसिंह महाराज ( थोरले) नगरवाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्याची लेखी शिफारस केली. आणी श्री.छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाची पंचवार्षिक निवडणुकच रद्द करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या चार व कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी येत्या दि.२८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. विश्वस्त मंडळाच्या चार जागांसाठी नऊ अर्ज आले होते तर कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी 23 अर्ज आले होते. अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित होते. त्यासंदर्भातील लेखी अर्जही छाननी च्या वेळी उपस्थित असलेले उमेदवार सुहास राजेशिर्के व विजय मांडके यांनी दिली आहे. त्याचे प्रोसिडिंग ही मागितले आहे. त्रुटी असल्याची लेखी तक्रार संस्थेचे आजिव सभासद विजय मांडके यांनी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एकदाही श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात उपस्थित न राहता त्यांनी निवडणूकच रद्द केली हे विशेष म्हणावं लागेल.