गोंधळलेल्या राज्य सरकारमुळे एमपीएससी परीक्षांची वाट लागली – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील


स्थैर्य,मुंबई,दि ११: राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार गोंधळलेले असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची वाट लागली, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केला. राज्य सरकारने तातडीने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन थेट मदत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एमपीएससीची परीक्षा कोरोनामुळे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पुढे ढकलली हे राज्य सरकारने स्पष्ट केले पाहिजे. कोरोनाच्या स्थितीतही आरोग्य विभागाच्या भरतीच्या परीक्षा झाल्या तर एमपीएससीच्या बाबतीत काय समस्या आहे, हे स्पष्ट केले पाहिजे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या सामान्य कुटुंबातील असंख्य विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. परीक्षा लांबल्यामुळे अनेकांची वयोमर्यादा ओलांडण्याची भीती आहे. सरकारला आता कोरोनाच्या कारणामुळे लगेच परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी एमपीएससीची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. तसेच परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी जो जास्तीचा खर्च येईल त्यासाठी मदत केली पाहिजे.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या कारणामुळे हे सरकार परीक्षा पुढे ढकलत असेल तर त्यांनी मराठा समाजाला आश्वस्त केले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाची केस सुप्रिम कोर्टात अशी काही गुंतागुंतीची केली आहे की, आता कधी निकाल लागेल सांगता येत नाही. त्यामुळे आमच्या भाजपाच्या सरकारने ‘जे ओबीसींना ते मराठा समाजाला’ या सूत्रानुसार जशी मदत केली तशीच मदत आरक्षणाच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सरकारने केली पाहिजे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी देणे, वसतीगृहे देणे, शिष्यवृत्ती देणे ही कामे आमच्या सरकारप्रमाणे केली पाहिजेत. तसेच मराठा समाजाला दिलासा मिळण्यासाठी एकूण जागा वाढविण्याचा उपायही विश्वासात घेऊन केला पाहिजे.


Back to top button
Don`t copy text!