स्थैर्य, सातारा, दि.३: पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्ये करणार्या धोकादायक गुन्हेगार शितल उर्फ नितीन भिमराव खरात वय 28, रा. पुसेगाव ता.खटाव याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शितल उर्फ नितीन खरात या गुंडामुळे दहशत माजली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे शितल उर्फ नितीन खरात याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. घोडके यांनी सादर केलेला होता. हा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी पडताळणी करून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. खरात याच्याकडून खून करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, साधी व गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, कट रचून भिती घालून खंडणी मागणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जबरी चोरी व सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होत असल्याची कृत्ये होत असल्याने व तो धोकादायकव्यक्ती झालेची खात्री झाल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबतचे आदेश काढले. त्यानुसार खरात यास सातारा जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, स.पो.नि. स्थानिक गुन्हे शाखेचे आनंदसिंग साबळे, सपोनि विश्वजित घोडके, उप.निरीक्षक बाळासाहेब लोंढे, हवालदार प्रविण शिंदे, तसेच पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार आनंदराव जगताप, विजय खाडे, सचिन माने, इम्तियाज मुल्ला, सुनिल अब्दगिरे, सचिन जगताप, विलास घोरपडे यांनी एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.