दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२४ | फलटण | येथील जेष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. शिंदे कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी नुकतीच स्व. सुभाष शिंदे यांच्या फलटण येथील “जिद्द” या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आगामी काळामध्ये चेतन शिंदे यांच्यासह स्व. सुभाष शिंदे यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणार असल्याचे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की; सुभाष शिंदे यांचे व माझ्या संपूर्ण कुटुंबियांचे अतिशय निकटचे संबंध होते. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी मी आलो असताना सुभाष शिंदे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागतासाठी येत असत. त्यावेळी त्यांचा हार सुद्धा ठरलेला होता. सुभाष शिंदे यांची पोकळी भरून काढणे शक्य नाही. आगामी काळामध्ये माझ्यासहित फलटण तालुक्यातील सर्व जनतेने चेतन व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे.
सुभाष शिंदे व त्यांचे सहकारी गत ३५ वर्षे हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तकाचे प्रकाशन करीत असत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे पुस्तक व प्रकाशन सोहळा हा अतिशय दिमाखात होत असे; असे मत व्यक्त करीत सुभाष शिंदे यांच्या जुन्या आठवणीना शरद पवार यांनी उजाळा दिला.
साहेब; तुम्ही सुभाष भाऊंसाठी साक्षात प्रभू श्रीराम होता
फलटण येथील जिद्द निवासस्थानी खासदार शरद पवार यांनी स्व. सुभाष शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी “साहेब; सुभाष भाऊंसाठी तुम्ही साक्षात प्रभू श्रीराम होता; तर ते तुमचे हनुमान होते.” असे मत व्यक्त केले त्यावर हे तुम्ही मला सांगत आहात ? असे म्हणत यापुढे चेतन सोबत सुद्धा आपली सर्व ताकद असणार आहे; असे त्यांनी स्पष्ट केले.