दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२३ | फलटण |
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, कन्या ताराराजे व इंदिराराजे यांनी भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुक्यांतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात व चर्चेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगाना या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करावा, त्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावावा यासाठी विशेष योजना तयार करून या ५५ दुष्काळी तालुक्यांसाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी खा. रणजितसिंह यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
हे दुष्काळी तालुके परंपरागत ‘दुष्काळी’ म्हणूनच आजही गणले जातात. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकर्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी केली. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारने निरा-देवघर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे, असे सांगितले. या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी मागणीही केली. तसेच या दुष्काळी पट्ट्यातील धोम-बलकवडी हा प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आता आठमाही होणार आहे. तो बारमाही करण्यासाठी काही योजना करता येईल का? याचेही केंद्र स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. तसेच पंतप्रधानांनी गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कटापूर योजनेसाठी निधी दिलेला असल्यामुळे या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे खासदारांनी पंतप्रधानांच्या कानी घातले असून या भागाचा आपण दौरा करावा व कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प लवकर मंजूर व्हावा व कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोर्यातील पाणी दुसर्या नदीच्या खोर्यात वळवता येत नसल्याने कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्णत्वास नेण्यात असलेल्या अडचणी दूर करून यावर उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना कृष्णा पाणी तंटा लवाद आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे, ही बाब खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली. या आयोगावर पंतप्रधान मोदींनी लक्ष घालण्याची विनंती केली.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुके कायमस्वरूपी सिंचनाखाली येणार आहेत व लाखो हेक्टर क्षेत्र बागायत होईल व या तालुक्यातील दुष्काळ संपून या भागातील शेतकरी सधन व शेतीसंपन्न होईल. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
यावेळी मतदार संघातील उर्वरित प्रश्न मार्गी लावावेत. यामध्ये बजेटमध्ये फलटण-पंढरपूर रेल्वेबाबत तरतूद झाली असून हेही काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी संबंधित विभागास आपण सूचना द्याव्यात, अशी विनंती खासदार रणजितसिंह यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर सकारात्मक विचार करून लवकरच हे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. या भेटीदरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाऊक झाले होते. लवकरच माढा मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.