स्थैर्य, फलटण दि.11 : माढा लोकसभा मतदार संघातील दुष्काळी पट्ट्यासाठी कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाची व्याप्ती मोठी असून या प्रकल्पाबाबत आपण स्वत: वैयक्तीक लक्ष घालून मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता करुन द्यावी. आपल्या प्रयत्नातून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मतदारसंघातील जनता आपली ऋणी राहील; अशा शब्दात माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी वरील विनंती त्यांनी केली.
सदर योजनेबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 22 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये लाभ होणार आहे. कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटकला न जाता ते अडवल्यास सिंचनाच्या व पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल व दरवर्षी येणारी पूरग्रस्त परिस्थिती सुद्धा यामुळे निर्माण होणार नाही. 12 वर्षांपुर्वी ही योजना तयार करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात ही योजना 2023 मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होती. ही योजना पूर्ण झाल्यास 110 टी.एम.सी. पाणी महाराष्ट्राला जादा मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा, अक्कलकोट, मंगळवेढा या भागातील पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल . तसेच ही योजना पूर्ण होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जनता व कर्नाटक सरकार हे दोन्ही अनुकूल आहेत. मात्र महाराष्ट्रातील सरकार याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आपण स्वत: यात लक्ष घालून दुष्काळी भागातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.