खासदार रणजितसिंह फलटणमध्ये उभारणार ७५ बेड्सचे कोरोना केअर सेंटर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २५ : सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वखर्चाने फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच रविवार पेठेमधील उत्कर्ष लॅाज येथे ७५ बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत फलटण तालुक्यातील कोरोना आढावा बैठक घेतली. त्या वेळी फलटणमध्ये कोरोना बाधित रूग्णांना बेड्स मिळत नसल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर आले. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरातील रविवार पेठेमधील उत्कर्ष लॅाज येथे सर्व सोयीसुविधा युक्त कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

सदर कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सीजनसह व्हेंटिलेटर बेड्स सुध्दा सुरू करण्यात येणार आहेत. या सोबतच रेग्युलर बेड्स सुध्दा कोरोना केअर सेंटरमध्ये असणार आहेत. आगामी काळामध्ये गरज भासल्यास बेड्स वाढवण्यासाठी सुध्दा तयारी या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दर्शवली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले की, सदर कोरोना केअर सेंटर बाबतचा प्रस्ताव फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे सादर केलेला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाचे उपचार तातडीने मिळण्यात यावेत यासाठी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. शासनाच्या माध्यमातून या कोरोना केअर सेंटरला मान्यता देवून येथे डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ देण्यात यावा. या व्यतिरिक्त इतर सर्व खर्च हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः करणार आहेत. जर राज्य शासनाच्या माध्यमातून येथे डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून दिला नाही तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः सर्व स्टाफची नेमणुक करून कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!