स्थैर्य, फलटण दि.१७ : गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या फलटण, लोणंद व खंडाळा उपविभागाच्या अंतर्गत येणार्या विविध गावांमधील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त अवस्थेत होते. यामुळे विशेषत: या भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत होते. सदरची बाब माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रश्नाबाबत त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेवून शेतकर्यांना येणार्या अडचणी अधिकार्यांना सागून तात्काळ ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 35 ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून उर्वरित 6 ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर 2 – 3 दिवसात बसवून नागरिकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याचे महावितरणच्या अधिकार्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कळविले आहे.
यामध्ये फलटण उपविभागाच्या अंतर्गत येणारे निंबळक, साखरवाडी, बरड, गिरवी, आसू, सोमंथळी, वाठार निंबाळकर, विडणी तर खंडाळा उपविभागाच्या अंतर्गत येणारे अहिरे, शिरवळ, लोणंद उपविभागाच्या अंतर्गत येणारे लोणंद, तरडगाव, वाठार कॉलनी या गावातील ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे.
दरम्यान, वीज पुरवठाबाबतच्या शेतकरी प्रश्नासंबंधी तातडीने लक्ष घालून न्याय मिळवून दिल्याबद्दल संबंधित गावातील शेतकर्यांकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कौतुक होत आहे.