फलटण पालिकेसाठी खासदार गटाची आघाडी, राजे गट मात्र ‘वेट अँड वॉच’; नगराध्यक्षपदाबाबत उत्सुकता शिगेला


स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आज (दि. १६) नगराध्यक्षपदासाठी आणि विविध प्रभागांमधील नगरसेवकपदासाठी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, आज दाखल झालेले बहुतांश अर्ज हे महायुतीचे अर्थात खासदार गटाचे असून, राजे गटाचा एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आज नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष अशा दोन प्रकारे अर्ज दाखल केले. तसेच प्रशांत अहिवळे यांनी अपक्ष म्हणून, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सचिन बेडके यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

विविध प्रभागांमध्येही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उत्साह दिसून आला. प्रभाग क्रमांक ५ मधून अशोक जाधव, प्रतापसिंह नाईक निंबाळकर, श्रद्धा गायकवाड आणि रोहित नागटिळे यांनी अर्ज भरले. प्रभाग क्रमांक ६ मधून किरण राऊत आणि मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी, तर प्रभाग क्रमांक ७ मधून अशोक जाधव, अमोल घाडगे, राजश्री राहिगुडे, पूजा घनवट आणि राजेंद्र निंबाळकर यांनी उमेदवारी दाखल केली.

प्रभाग क्रमांक ८ मधून सिद्धाली अनुप शहा, प्रभाग क्रमांक ९ मध्ये सचिन गानबोटे, अमोल भोईटे आणि रझिया मेटकरी यांनी अर्ज सादर केले. प्रभाग क्रमांक १० मधून अमित भोईटे आणि जयश्री भुजबळ, तर प्रभाग क्रमांक १२ मधून प्रवीण आगवणे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून प्रभा हेंद्रे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तसेच प्रभाग क्रमांक १३ मधून सचिन सूर्यवंशी-बेडके, विजया कदम आणि राहुल निंबाळकर यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले.

खासदार गटाची आघाडी; राजे गटाचे पत्ते गुलदस्त्यात

आज दाखल करण्यात आलेले अर्ज हे प्रामुख्याने महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (खासदार गट) समर्थकांचे असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, नगरपरिषदेवर ३० वर्षे सत्ता असलेल्या राजे गटाचा एकही अर्ज अद्याप निवडणूक कार्यालयात जमा झालेला नाही. राजे गटाचे उमेदवार आणि रणनीती अद्याप गुलदस्त्यात आहे.

उद्या (दि. १७) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येणार आहे. उद्याच्या एकाच दिवसात राजे गटाचे सर्वच्या सर्व आणि खासदार गटाचे उर्वरित अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षपदाचे चित्र अस्पष्ट

अद्याप दोन्ही प्रमुख गटांकडून नगराध्यक्षपदाचा अधिकृत (एबी फॉर्मसह) अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. अशोकराव जाधव यांनी अर्ज भरला असला तरी अंतिम उमेदवार कोण असणार, हे पक्षाच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नक्की निवडणूक कशी होणार आणि थेट लढत कोणामध्ये होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी अर्ज स्वीकारले. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कामकाज पाहिले.


Back to top button
Don`t copy text!