दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२४ | फलटण |
बडेखान, ता. फलटण येथे ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने पिकअपचा तीन-चार पलटी घेऊन गंभीर अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. याचवेळी या ठिकाणावरून माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीचा ताफा जात असताना खासदार साहेबांनी गाडी थांबवून अपघातस्थळी जाऊन अतिशय जलद गतीने अपघातग्रस्ताला ‘तुम्हाला काही होणार नाही, बिलकुल चिंता करायची गरज नाही’, असा आधार देत उपचारासाठी स्वतःच्या ताफ्यातील गाडीने तातडीने सिद्धीविनायक हॉस्पिटल, लोणंद येथे घेऊन गेले व अपघातग्रस्ताचा जीव वाचविला.
या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर कोथरूड, पुणे येथील संतोष बोडके हा गंभीर जखमी झाला असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने मदत केल्यामुळे त्यांचा जीव वाचविण्यात खासदार साहेबांना यश आले.
मागील दोन दिवसांपूर्वी सुरवडी येथील जगताप वस्तीवर झालेल्या अपघातातील अपघातग्रस्तांनाही खासदार साहेबांनी अशाचप्रकारे तातडीने मदत केल्यामुळे दोघांचे जीव वाचवण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे खासदार साहेबांनी केलेल्या तातडीच्या मदत कार्यामुळे आज पुन्हा एक जीव वाचला.
या अगोदरसुद्धा खासदार साहेबांनी अनेकांचा जीव वाचवण्यासाठी असेच तातडीने मदतकार्य केले आहे. त्यांच्या या मदतकार्यामुळे त्यांची जनतेतून प्रशंसा होत आहे व त्यांच्या या कामगिरीवर जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
खासदार साहेबांना या अपघातग्रस्ताची मदत करण्यासाठी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी, स्थानिकांनी व रस्त्यावरून जाणार्या प्रवाशांनी खूप मोलाची मदत केली.