कोरोना बाधीतांना उपचारासाठी प्रवृत्त करा, प्रसंगी कटुता स्विकारा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२५: कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कटुता स्विकारुन कोरोना बाधीतांना औषधोपचाराशिवाय घरात थांबू न देण्याची भूमिका स्विकारावी लागेल अन्यथा कितीही उपाय योजना आणि लॉक डाऊन केले तरी कोरोना गावातून हद्दपार होणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तरडगाव येथे विशेष अतिथी म्हणून बोलताना दिला आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कोरोना केअर सेंटर तथा विलगीकरण कक्षाचे हिंदवी पॅलेस मंगल कार्यालय, चांदोबाचा लिंब, तरडगाव येथे उदघाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. दिपकराव चव्हाण होते. यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई बाबासाहेब खरात, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, माजी सभापती वसंतकाका गायकवाड व सौ. प्रतिभाताई धुमाळ, पंचायत समिती सदस्या सौ. विमलताई गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोटे, लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाईकर, तरडगाव प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, सरपंच सौ. चव्हाण, सोसायटी चेअरमन यांच्या सह तरडगाव पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

गृह विलगीकरणात थांबल्याने कुटुंबातील अन्य व्यक्ती, त्यातून शेजारी याप्रमाणे कोरोना साखळी वाढत असल्याने गावाच्या, तालुक्याच्या दृष्टीने गृह विलगीकरण फायद्याचे नसल्याने अशा बाधीत व्यक्तीला प्रसंगी कटुता स्विकारुन पदाधिकारी, कार्यकर्त्यानी संस्था विलगीकरण कक्षात दाखल करावे, अधिक उपचाराची गरज असेल तर रुग्णालयात दाखल करावे तेथे त्यांची सर्व व्यवस्था करण्याची ग्वाही देत आता कोणाही बाधीताला मला काही त्रास नाही म्हणून घरात, कुटुंबात राहु देवू नका ते फार धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट करीत असे लोक ऐकले नाहीत प्रशासन त्यांना सक्तीने रुग्णालयात दाखल करेल ती वेळ येऊ देवू नका वेळीच उपचार घेऊन बरे व्हा असा प्रेमाचा सल्ला यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

गावातील प्रा. शाळा, समाज मंदिरांमध्ये विलगीकरण कक्षांची उभारणी केली, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, सभापती शिवरुपराजे यांनी सरपंच, दक्षता समिती अध्यक्ष, अन्य पदाधिकाऱ्यांच्या ऑन लाईन बैठका घेतल्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र लोक बाधीत असूनही कुटुंबात राहुन कुटुंबाचे नुकसान करणार असतील तर प्रसंगी कटुता स्विकारुन त्यांना कुटुंबाचे, गावाचे, तालुक्याचे हित जपण्यासाठी तुमचे स्वतःचे आरोग्य मजबुत ठेवण्यासाठी योग्य उपचार घेण्याची आवश्यकता समजावून देण्याची गरज असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

बेडची उपलब्धता, औषधे, ऑक्सिजन व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आम्ही कोठेही कमी पडलो नाही, पडणार नाही याची ग्वाही देत संपूर्ण राज्यभर ऑक्सिजनचा तुटवडा असताना लोणंदचा बंद कारखाना सुरु करुन ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला, त्यापूर्वी श्रीमंत संजीवराजे यांचा कारखाना बंद ठेवून तेथील ऑक्सिजन प्लांट दवाखान्यांना जोडून दिला,रिकाम्या ऑक्सिजन सिलेंडरच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी लक्षावधी रुपये डिपॉझिट करुन सिलेंडर उपलब्ध करुन दिले, शासन, प्रशासन अहोरात्र मेहनत घेऊन उपचाराच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असताना ज्यांच्या साठी हे केले ते त्यापासून दूर जाऊन स्वतःचे व समाजाचे नुकसान केवळ अज्ञाना पोटी करीत असतील तर त्यांना समजावून देवून योग्य उपचारासाठी पुढे आणले पाहिजे, ही मंडळी घरात राहिल्याने बरी होणार नाहीत, आणि कोरोना हद्दपार होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

आ. दिपकराव चव्हाण यांनी तरडगाव विलगीकरण कक्ष, तेथील सुविधा याविषयी माहिती देवून तरडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील ग्रामस्थांना याचा लाभ घेऊन कोरोना हद्दपार करण्याच्या प्रयत्नांत साथ करण्याचे आवाहन केले.


Back to top button
Don`t copy text!