दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । फलटण । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संतांच्या पादुका आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) बसने श्री क्षेत्र पंढरपूरला नेण्यात येत आहेत. आज (रविवार) कौंडण्यपूरहून माता रुक्मिणीच्या पादुका श्री क्षेत्र पंढरीत दाखल झाल्या. उद्या (सोमवार) माऊली, तुकोबांसह मानाच्या आठ संतांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरीकडे मार्गस्थ होत असून त्या दुपारी २ वाजेपर्यंत वाखरीत दाखल होतील.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारीसाठी राज्यातील मानाच्या दहा संतांच्या पादुका राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) बसने श्री क्षेत्र पंढरीस नेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार संतांच्या पादुका आणण्यासाठी प्रत्येकी दोन बसेस देण्यात आल्या आहेत.
आज (रविवार) अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरहून माता रुक्मिणीच्या पादुका दुपारी २ वाजता श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. त्या नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर मार्गे रात्री पंढरीत दाखल झाल्या आहेत.
उद्या (सोमवार) आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर माऊली, देहूहून श्री संत तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरहून श्री संत निवृत्तीनाथ महाराज, सासवडहून श्री संत सोपानदेव व श्री संत चांगावटेश्वर महाराज, मुक्ताईनगरहून श्री संत मुक्ताबाई महाराज, पैठणहून श्री संत एकनाथ महाराज व पिंपळनेरहून श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पादुका मार्गस्थ होत आहेत. या संतांच्या पादुका दुपारी २ वाजेपर्यंत वाखरीत दाखल होतील.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व संतांच्या पादुकांसमवेत येणाऱ्या वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाखरी येथून सायंकाळी ४ वाजता या संतांच्या पादुका व सुमारे ४०० वारकरी तीन हजार पोलिसांच्या बंदोबस्तात इसबावी पर्यंत चालत जातील. येथे समाज आरती होइल व तेथून प्रत्येक सोहळ्यातील दोन या प्रमाणे २० वारकरी तीन हजार पोलिसांच्या बंदोबस्तात संतांच्या पादुका घेवून श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होतील.