‘आई मला माफ कर…’ अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भंडारा, दि. ७: राज्यात वेगवेगळ्या आत्महत्यांची प्रकरणे गाजत असताना एका वर्ग एकच्या अवघ्या 27 वर्षाच्या महिला अधिकाऱ्याने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येनं भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शीतल फाळके असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्या लाखनी येथे तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मूळ सातारा जिल्ह्यातील परडी येथील शीतल या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी लाखनी येथे महिला व बाल विकास अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. अत्यंत हुशार आणि मनमिळावू म्हणून त्यांची ओळख होती. दोन महिन्यापूर्वीच त्याच्याकडे पवनी येथील अतिरिक्त प्रभारही देण्यात आला होता.

शीतल या लाखनी येथे किरायाच्या घरात आपल्या आईसोबत राहत होत्या. 6 मार्च रोजी रात्री आई सोबत टीव्ही बघितल्यानंतर दोघीही झोपी गेल्या. दरम्यान पहाटे तीन वाजताच्या सुमारास प्रसाधनगृहात गेलेल्या आईला शीतल या गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले. लाखनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर शीतल यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. घेऊन कुटुंबीय सातार्‍याच्या दिशेने निघाले आहेत.

वर्ग-1 च्या हुशार अधिकाऱ्याने केलेली आत्महत्या मनाला सुन्न करणारी आहे. शीतल यांच्या आत्महत्येचे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. लाखनी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक याचा तपास करीत आहेत.

आई मला माफ कर…तुझी लाडकी, लिहील चिठ्ठी
रात्री उशिरापर्यंत आईच्या मांडीवर डोके ठेवून टीव्ही पाहणाऱ्या शीतल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आत्महत्या मागचे कुठलेही कारण नमूद केलेली नाही. ‘यासाठी कुणालाही दोषी धरू नये. मी माझ्या मनाने आत्महत्या करीत आहे. आई मला माफ कर, तुझी लाडकी’ एवढेच त्यात नमूद आहे.


Back to top button
Don`t copy text!