
स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शहरामध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून लावलेल्या झाडांची निगा राखावी अशी मागणी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दोन स्वतंत्र निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की सातारा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना चावा घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत वरवर नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. मोकाट कुत्र्यांच्या वावर यामुळे शहरातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून आपण त्याचा त्वरित बंदोबस्त होण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत.
सातारा नगरपरिषद हद्दीमध्ये केंद्र शासनाने अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून झाडे लावलेली आहेत. मात्र ज्या एजन्सीने झाडे लावली तसेच त्यांची देखभाल करण्याचे काम दिले होते ती एजन्सी कोणत्याही प्रकारे या झाडांची देखभाल करत नाही. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही नगरपालिका प्रशासन व एजन्सी कोणत्याही प्रकारे कार्यवाही करत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सातारा शहराच्या सौंदर्यामध्ये शोभा येत नसेल तर याची गांभीर्याने दखल घेऊन शहरामध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून लावलेल्या झाडांची निगा राखावी, या मागणीचे स्वतंत्र निवेदन धनंजय जांभळे यांनी दिले आहे.