माढ्याच्या वाटचालीत मोहिते-पाटीलच ‘किंगमेकर’…


माढा लोकसभा मतदारसंघाचा जन्म तसा २००८-०९ सालचा, जेमतेम आतापर्यंत तीन टर्म निवडणुका झालेला हा मतदारसंघ, पण कायम चर्चेत राहिलेला..

होऊ घातलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीतही चित्र काही वेगळं नाही. त्याची कारणं ही तशीच आहेत. मुळातच या मतदारसंघाची रचना ही सातारा आणि सोलापूर या दोन जिल्हातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघ मिळून झालेली. दोन वेगळे जिल्हे असल्याने भौगोलिक, प्रशासकीय आणि राजकीय परिस्थितीही वेगळी असल्यामुळे तिला सोयीस्कर ठरेल अशी एका धागेत आणणं हे मेहनतीच काम. याउलट एका जिल्ह्यापुरत्या मर्यादित असणार्‍या मतदारसंघांना वरील बाजू अभ्यासास आणि त्यादृष्टीने पावले उचलण्यासाठी काही प्रमाणात का होईना उजवं ठरतं.

तसं या मतदारसंघावर राजकीय वर्चस्व राहिलंय ते अकलूजच्या मोहिते पाटील यांचं, २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः शरद पवार साहेब यांनी या मतदार संघाचं नेतृत्व हातात घेत निवडणूक लढवत भरघोस मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुभाष देशमुख आणि महादेव जानकर यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. अर्थातच या विजयात मोठं मताधिक्क्य मोहिते पाटील यांनी दिलं होतं, शिवाय शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या मतदासंघात आहे आणि हेच मूळ कारण की शरद पवारांना निवडणुकीसाठी माढा योग्य वाटला असावा. पुढे २०१४ साली परिस्थिती बदलली. विरोधकांचा सूर माढाच्या बाबतीत एकवटला होता, काहीही करून माढा जिंकायचं, हे पक्क करत ‘माढा नि पवारांना पाडा’ हा सूर विरोधकांनी लावला. अशा परिस्थितीत विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि तत्कालीन मोदी लाटेत ही समाजवादी कामगार पक्षाच्या सदाभाऊ खोत यांचा पराभव करत हा गड कायम राखला.

२०१९ साली झालेली राजकीय पालथापालथीमध्ये मोहिते पाटील हेही चुकले नाहीत. शिक्षण संस्था, सहकार वाचवायचं तर भाजपाची वाट धरणार्‍या नेत्यांच्या रांगेत विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे उभे राहताना दिसले, या निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यात तिकीट नको म्हणून इतर तालुक्यातील आमदारांचा छोट्या मोठ्या नेत्यांचा सूर होता, स्वतः विजयसिंह मोहिते पाटील आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या तिकिटासाठी किंवा शरद पवारांनी स्वतः उभा राहावं यासाठी आग्रही होते; परंतु हे घडून आलं नाही, परिणामी मोहीते पाटील भाजपवासीय झाले, पण दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेला नव्हता.

भाजपकडून तिकीट मिळेल असं असताना अचानकपणे फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा काँग्रेसमधून भाजप प्रवेश होत त्यांना लोकसभेच तिकीट ठरलं. अर्थातच पक्षाचं काम करणं, नवीन पक्षात आपली ताकद दाखवणं पर्यायाच असल्याने त्या साली मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठी उभे करत माढाच्या खासदारपदी बसवलं, राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव झाला आणि हा पराभव माळशिरसकरांनी घडवून आणला, हे सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट होत.

माढा व्यतिरिक्त मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्ह्यावर असणारी पकड सगळ्यांना ज्ञात आहे. शंकरराव मोहिते पाटील यांचं अकलूज, माळशिरस, सोलापूर भागात सहकार क्षेत्रातलं काम आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी जपलेला वारसा, यामुळे मोहिते पाटील कायम लोकांचा विश्वासात राहिले.

१९९९ साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी स्थापनेवेळी पुढच्या फळीतील नेते म्हणून विजयसिंह होते, पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन ग्रामीण विकास अशी खाती त्यांनी सांभाळली.

राज्याच्या, जिल्ह्याच्या राजकारणात असणारं राजकीय वजन, विकास कामे, विविध शिक्षण संस्था, सहकारावर पकड असणारं मोहिते पाटील घराणं आणि एवढं मोठ नाव असताना देखील मागील पाच वर्षाच्या काळात भाजपकडून मोहिते पाटील यांना वेळोवेळी डावललं जात असल्याचं बोललं जात होतं. जिल्हा, मतदार संघ विकास प्रकल्पात परस्पर निर्णय घेतले जातात, असाही सूर होता आणि या सगळ्याची प्रचिती आली ती २०२४ च्या लोकसभा उमेदवार निवाड्यावेळी. तीनही टर्म ‘किंगमेकर’ ठरलेल्या मोहिते पाटलांना विचारात न घेता पहिल्या यादीत त्यांचा विरोध असणार्‍या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली गेली.

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असताना, इथंही त्यांना विचारात घेतलं गेलं नाही.

दरम्यान, मोहिते पाटील घराण्याने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत निवडणूक कोठून का असेना लढायची आणि जिंकायची, हे ठरवलं आहे. त्यादृष्टीने गावोगावी भेटी, सभा, दौरे करताना धैर्यशील मोहिते पाटील दिसतायंत. आता मोहिते पाटील पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवणार, की चर्चेनुसार आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, हे पाहणं महत्वाचं आहे, जर असं झालं तर कोण कोण शरद पवार गटात जाणार, हेही पाहणं औत्सुक्याचे असेल.

मोहिते पाटील यांची घरवापसी होणार का आणि त्यानंतर त्यांच्या राजकारणाची वाटचाल कशी असेल, हे आताच सांगता येणं कठीण आहे.

या निवडणुकीत मोहिते पाटील आपली पूर्ण ताकद पणाला लावतील, अर्थात पुढचा उमेदवार तगडा आणि सत्ताधारी पक्षाचा असल्याने ती तितकीच अवघडही असेल, पुढे निकाल काय तो मतदारराजा ठरवेल खरं; परंतु ही निवडणूक मोहिते पाटील यांच्यासाठी फक्त लोकसभेची निवडणूक नसेल तर ही लढाई आपल्या राजकीय अस्तित्वाची, पुनरागमनाची असेल, हे नक्की.

– प्रतिक बनकर, (Msc Chemistry)
ढवळ, फलटण.
९११९४५३६०२


Back to top button
Don`t copy text!