दैनिक स्थैर्य | दि. 14 एप्रिल 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे दमदारपणे तुतारी वाजवतील व ४ जून रोजी माढ्याचा गुलाल घेऊनच लोकसभेत जातील; असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
अकलूज येथील शिवरत्न निवासस्थानी आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते – पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष महबूब शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की; सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणताही निर्णय घेताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या माध्यमातूनच निर्णय घेतला जातो विजयसिंह मोहिते – पाटील यांना विचारत न घेता सोलापूर जिल्ह्याचे राजकारण होऊ शकत नाही.
कृष्णा भीमा नदी जोड प्रकल्प, नीरा देवधर प्रकल्प असो किंवा अन्य विविध प्रकल्पांना चालना देण्याचे काम विजयसिंह मोहिते – पाटील यांनी त्यांच्या काळामध्ये केलेला आहे. आज आत्ताचे आपल्याला काम दिसत आहे; याला कारणीभूत हे विजयसिंह मोहिते – पाटील हेच आहेत. मी जलसंपदा मंत्री असताना विजयसिंह मोहिते – पाटील यांनी वेळोवेळी बऱ्याच प्रकल्पांना चालना देण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. कृष्णा भीमा नदीजोड प्रकल्पासाठी तर विजयसिंह मोहिते – पाटील यांनी तब्बल चार ते पाच पानांचे लेखी पत्र तयार करून माझ्याकडे सादर केले होते. विजयसिंह मोहिते – पाटील यांनी केलेल्या कामांचे श्रेय इतर कोणीही घेऊ शकत नाही; असेही यावेळी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.