दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । नवी दिल्ली । ‘जी-७‘ देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ व २७ जून रोजी जर्मनीला जाणार आहेत. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदी अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत.
यानंतर २८ जूनला ते संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार असून दिवंगत माजी अध्यक्ष शेख खलिफा बीन जायद अल नाहयान यांना आदरांजली अर्पण करतील, तसेच नवनियुक्त अध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नाहयान यांना शुभेच्छा देतील. तत्पूर्वी, भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे संमेलन २३ व २४ जून रोजी होत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून मोदी व्हर्चुअल माध्यमातून सहभागी होतील.