दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२३ | नवी दिल्ली |
देशात आज पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने बंपर विजय मिळवत तीन राज्यात सत्ता काबीज केली आहे. राजस्थानमधील मतदारांनी आपली परंपरा कायम राखत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला नाकारत भाजपाला बहुमत दिले, तर मध्य प्रदेशमध्ये यावेळेला शिवराजसिंह चौहान यांची सत्ता जाणार, अशी अटकळ विरोधी पक्षांमधून व एझिट पोलमधून सांगितले जात होते. मात्र, या ठिकाणीही पंतप्रधान मोदींनी आपल्या करिष्म्याने पुन्हा भाजपाला मोठा विजय मिळवून दिला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता टिकविणार असे सर्वांनाच वाटत असताना येथेही भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. विशेष बाब म्हणजे या तीनही राज्यात ठिकाणी मोदींनी आपला चेहरा वापरत भाजपाला पुन्हा सत्तेत मोठ्या बहुमताने आणले आहे. त्यामुळे आजही देशात ‘मोदी लाट’ कायम असल्याचे सिध्द झाले आहे.
दरम्यान, चौथे राज्य तेलंगणात मात्र काँग्रेसने दहा वर्षांच्या ‘बीआरएस’ च्या सत्तेला उलथवत सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत होऊन कर्नाटक नंतर तेलंगणा त्यांनी काबीज केले आहे.
आज पार पडलेल्या निवडणूक निकालानंतर २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात तिसर्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळे देशभर भाजपा कार्यकर्ते प्रचंड जल्लोष करत आहेत.