स्थैर्य, फलटण, दि. २७: संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) सातारा पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई या पूर्वीच केली आहे. अनेक टोळ्यांवर प्रभावीपणे ‘मोक्का’ लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. आगामी काळामध्ये, फलटण तालुक्यातील गुन्हेगारांना ‘मोक्का’मध्ये शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून पाठपुरावा सुरू ठेवून कायद्याचा धाक राहील. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्पष्ट केले.
फलटण येथील जबरी चोरीचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी उघडकीस आणला. पत्रकार परिषदेद जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल बोलत होते. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश हा कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद केलेली असून आगामी काळामध्ये फलटण शहर व तालुक्यात बेकायदा खाजगी सावकारकी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गरज पडली तर तडीपार व मोक्का यांच्या सारखे सुद्धा गुन्हे नोंद केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.
जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील पोलिस वसाहती तसेच नादुरूस्त पोलिस स्टेशनच्या दुरूस्तीसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त निधी मंजूर करून घेऊ. या निधीतून ग्रामीण भागातील पोलिसांच्या निवासस्थानांच्या दुरूस्तीला प्राधान्य देणार असल्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले.
कोळकी पोलीस दूरक्षेत्र इमारत फलटण-दहिवडी व फलटण-शिंगणापूर या मुख्य रस्त्यावर उभारण्यात यावी. कोळकी येथील जागा पोलिस प्रशाशनाच्या नावावर झालेली आहे. या दोन्ही रस्त्यावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या कोळकी शहराच्या विस्ताराला कायदा, सुव्यवस्था सांभाळणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावरील जागा अतिशय योग्य आहे. परंतु कोळकी परिसरातील गुन्हे व इतर प्रशाकीय माहिती घेऊन लवकरात लवकर तेथे कश्या प्रकारे पोलीस दूरक्षेत्र उभे राहील या साठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.