स्थैर्य, बुलडाणा, दि. २३: राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातही मोबाईल मेडिकल युनिट वाहन मंजूर झाले असून हे वाहन मेहकर, लोणार व खामगाव तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहे. या वाहनाची आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी वाहनामधील वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. तसेच सुविधांविषयी माहिती घेतली. या मेडिकल युनिटचा जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांच्या वैद्यकीय गरजांसाठी पुरेपूर उपयोग करावा. कोविडच्या काळात युनिटमधील वैद्यकीय सेवांचा लाभ द्यावा. लसीकरण व कोरोना तपासणीसाठी युनिटचा वापर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. सदर मोबाईल मेडिकल युनिट चालविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ व वाहन चालक भरण्यात आला असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या युनिटमध्ये रक्त चाचणी, ताबडतोब अहवाल आदींसह अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी दिली.