दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जावळी सोसायटी मतदारसंघातून आमदार शशीकांत शिंदे संचालक आहेत. पण, यावेळेस याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आमदार शशीकांत शिंदेंपुढे अडचण निर्माण झाली आहे. रांजणेंचा अर्ज मागे घेण्यासाठी आता शिवेंद्रसिंहराजेंना तर दीपक पवारांचा अर्ज मागे घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मध्यस्थी करावी लागणार आहे.
त्यावरच जावळी सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अवलंबून आ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यावेळेस विद्यमान दिग्गज संचालकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण यावेळेस प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये पहिल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या आमदार शशीकांत शिंदे यांचा जावळी सोसायटी मतदारसंघाचा समावेश आहे. कोरेगाव मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर आमदार शिंदे यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघाचा शोध सुरू केला आहे. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणुक लढली होती.
जावळीत शशीकांत शिंदेंना रोखण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक रांजणे रिंगणात
आता २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार शशीकांत शिंदेंनी पुन्हा स्वगृही जाऊन सातारा-जावळीतून लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी जावळीत पुन्हा मोर्चे बांधणी सुरू केली. त्यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदेंत कलगीतूरा रंगला होता. याच दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणुक लागल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आपले जावळी तालुक्यातील समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून तयार केले. त्यामुळे या दोन आमदारांतील वाद वाढला. एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत मजल गेली.
पण, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला हा वाद घातक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोन नेत्यांत मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोघांतील कलगीतूरा शांत झाला होता. पण आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शिवेंद्रसिंहराजेंचे जावळीतील समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी जावळी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तसेच अर्जाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे जावळीतील नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनीही जावळी सोसायटीतून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांचा अर्जामुळे आमदार शशीकांत शिंदे यांच्यापुढे या मतदारसंघातून अडचण निर्माण झाली असून निवडणुक सोपी राहणार नाही. मागील वेळी ही दीपक पवार यांनी जावळी सोसायटीतून शशीकांत शिंदेंविरोधात निवडणुक लढली होती. श्री. पवार यांना पराभूत करून शशीकांत शिंदे जिल्हा बँकेवर संचालक झाले होते.
शिवेंद्रसिंहराजेंना नेतृत्वासाठी शशीकांत शिंदेंची खुली ऑफर….
यावेळेस दीपक पवारांची सभापती रामराजेंकडून समजूत काढली जाऊ शकते. तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठरविले तर ज्ञानदेव रांजणे यांचाही अर्ज मागे घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शशीकांत शिंदेंची अडचण दूर होऊन ते बिनविरोध होऊ शकतात. पण, त्यासाठी पुन्हा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागणार आहे.