दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | सातारा |
माथाडी कामगारांचे नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे सातार्यात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंच्या राजकारणाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
माथाडी कामगार संघटनेत संयुक्त चिटणीस या पदावर ऋषिकांत शिंदे कार्यरत आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथील घणसोली येथे माथाडी कामगारांच्या सोसायटीच्या निवडणुकीत ऋषिकांत शिंदे यांनी माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व आमदार गणेश नाईक यांच्या पॅनलचा पराभव केला होता. या सोसायटीमध्ये सिडकोने अल्प उत्पन्न गटातील माथाडी कामगारांसाठी ३३ इमारतींमध्ये ३३०० घरे उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे. हे संकुल २२ एकर जागेमध्ये उभे करण्यात येणार आहे. या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या इमारतीची पुनर्विकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची फाईल नगर विकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पोहोचली आहे. त्यामुळे ऋषिकांत शिंदे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या सोसायटीतील विजयानंतर काही सूत्रे ऋषीकांत शिंदे यांच्या हाती आली होती. ऋषीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या संघटनेत प्रवेश केला आहे. यामागे मोठी राजकीय खेळी आहे. यामुळे माथाडी संघटनेत आता नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे आणि ऋषिकांत शिंदे असे तीन गट पडले आहेत. ऋषिकांत शिंदे यांच्या प्रवेशामुळे घणसोली येथील प्रकल्पाला गती मिळणार आहे. त्याचा फायदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला होणार आहे.
जावळी तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांचे मोठे वर्चस्व असून अलीकडच्या काळात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ऋषिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जावली तालुक्यातील राजकारणावर कोणताही फरक पडणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले. ते पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नव्हते. ऋषिकांत शिंदे यांच्या मागे माथाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) याचा मुंबई आणि सातारा जिल्ह्यात फायदा होणार आहे, असे जावळीतील शिवसेना नेत्याने सांगितले.